पुस्तक | संभाजी | लेखक | विश्वास पाटील |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ८६४ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
पुरंदरी शिवपोटी जन्म घेऊन अवघ्या काही काळातच मातृसुखाला पारखा झालेला शिवछावा, जन्मापासून संकटांवर मात करत आयुष्यातल्या सगळ्या लढाया जिंकणारा स्वराज्याच्या गादीचा दुसरा छत्रपती, थोरल्या महाराजांनंतर अंगावर आलेला गनीम व अंतर्गत माजलेल्या स्वार्थाच्या स्तोमाने पोखरलेल्या स्वराज्याला आपल्या असिमीत पराक्रमाने अन मुत्सद्दीपणाने सावरणारा राजा, मृत्यूलाही जिंकून घेतलेला महामृत्युंजयी धर्मवीर शंभुबाळाची गाथा म्हणजे, संभाजी|!
युवराज ते छत्रपती हा संभाजी राजांचा प्रवासच मुळात खडतर. प्रचंड आव्हाने, दुफळी यांचा सतत सामना करत हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकण्यात ते यशस्वी झाले ते महाराजांनी व जिजाऊंनी पाजलेल्या बाळकडूच्या जोरावर! कोवळ्या वयात दिल्लीला जाऊन मयूर सिंहासनात बसलेल्या बादशहाला नजर भिडवणारा शंभुबाळ त्याच तडफेने मृत्यूच्या दारात देखील तसेच डोळे त्यावर वटारतो. जगाच्या पाठीवर कोणालाही लाभला नाही असा मृत्यू शंभुराजांना लाभला. तप्त सळयांनी डोळे काढले गेले, जिव्हा कापली गेली, बटाट्याच्या सालीप्रमाणे कातडी सोलली गेली तरी तो नमला नाही.
"असा एकही पुत्र आपल्या वाट्याला का आला नाही"
हा प्रश्न खुद्द औरंगजेबाला अल्लाकडे करायला लावणारा युवराज स्वराज्याला लाभला हे या मातीचं भाग्यच!
एकाच वेळी पाच पाच शत्रू अंगावर घेणारा, जंजिऱ्याला भगदाड पाडत सिद्धीला जेरीस आणणारा व प्रसंगी पोर्तुगीजांना आपल्या दहशतीने राजधानीचे ठाणे हलवायला भाग पाडणारा संभाजी, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या कुलमुखत्यार धर्मपत्नी येसूबाई, कटकारस्थानांमधून त्यांना वाचवणारे निष्ठावंत हंबीरराव मोहिते, कवी कलश आदी मंडळींची शौर्यगाथा लिहताना विश्वास पाटलांनी जी शब्दरूपी रंगाची उधळण संभाजी कादंबरीतून केली ती उल्लेखनीय आहे.
राजा संभाजी रंगेल होता की शत्रूच्या उरात धडकी भरवणारा होता, कवी मनाचा होता की मंत्र्यांना हत्तीच्या पायी देणारा निष्ठुर राजा होता, औरंगजेबाला एक इंचही जिंकून न देणारा मुत्सद्दी होता की बुऱ्हाणपूर लुटून मुघली सल्तनत हादरवणारा चलाख शासक होता, अशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संभाजी एकदा वाचायला हवी. विश्वास पाटलांनी राजांचा मृत्यू रेखाटताना केलेलं वर्णन वाचताना डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. जो मृत्यू वाचताना आपणास गहिवरून येतं तो मृत्यू शंभूराजांनी कसा भोगला असावा या विचारांनी मन सुन्न होतं.
विश्वास पाटलांसारख्या अभ्यासू लेखकाच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचताना आपण शौर्य, साहस, संयम आणि धर्मनिष्ठा इत्यादी महाराजांचे अंगभूतगुण अनुभवू शकतो. तलवारीच्या पातीवर आणि मराठी मातीवर असणारे युवराजांचे प्रेम आपल्याला पदोपदी "संभाजी" या कादंबरीतून अनुभवायला मिळतं. असा हा बहुगुणी राजा या मातीत जन्मला, जगला आणि वीरगतीस प्राप्त झाला मात्र वडिलांच्या कर्तृत्वापुढे त्याचं कर्तृत्व जनमाणसांपर्यंत पोहोचू शकलं नाही, हि खंत या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच मिटवली जाईल असं मला वाटतं. संभाजी या व्यक्तिमत्वाला न्याय देताना इतिहास कमी पडतो व तोच विश्वास पाटलांनी आपल्या शैलीत उत्तमरीत्या मांडल्यामुळे संभाजी ही कादंबरी साहित्यक्षेत्रात व वाचकांच्या मनात उजवी ठरते.
-© गिरीश अर्जुन खराबे.