रश्मिरथी - रामधारी सिंह दिनकर | Rashmirathi - Ramdhari Singh Dinkar | Marathi Book Review

रश्मिरथी-रामधारी-सिंह-दिनकर-Rashmirathi-Ramdhari-Singh-Dinkar-Marathi-Book-Reviews
पुस्तक रश्मिरथी कवी रामधारी सिंह "दिनकर"
प्रकाशन लोकभारती पेपरबैक्स समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १९१ मूल्यांकन ५ | ५

कधी कधी आपण अगदीच दुर्लक्षित आहोत, एकटे आहोत आणि स्वतःशीच स्वतः झगडत असताना आपल्याला काहीतरी आतून साद घालणारे हवे असते. जे आपले मनोबल वाढवेल. मनाला शांत करेल.. जिवाला आधार देईल. आणि अशा काळात "रश्मिरथी" सारखी पुस्तकं मनाला उभारी देतात. असे खूप कमी लोक असतील ज्यांना हे पुस्तक ठाऊक नाही. कर्णाच्या आयुष्यावर आधारित एक अविस्मरणीय कविता. खंडकाव्य या स्वरूपात लिहिले गेलेले असे खूप कमी पुस्तकं आहेत, त्यातीलच हे एक आहे. आणि तेही एक चरित्र उलघडून दाखवणारं. महाभारतातील व्यक्तिरेखा सर्व वाचकांच्या मनात रुतून बसलेल्या असतात. सर्वांना तोंडपाठ असतात. अशातच कर्ण म्हणजे, अतिशय वादग्रस्त, पण तरीही लोकप्रिय अशी व्यक्तिरेखा.

मूळतः हिंदी भाषेत असणारे हे पुस्तक, मराठी वाचकांनी देखील डोक्यावर घेतलेले आहे, हे मी सांगू इच्छितो. आणि त्याचे कारणही तसेच आहे. या पुस्तकाची भाषा, त्यातील तत्वज्ञान, मांडलेले विचार, त्यावर अलंबून असलेली त्यांची व्यक्तिरेखा, मनातील अव्यक्त भावना, त्यातून बदलणारी परिस्थिती आणि परिणाम यांची सांगड घालून रामधारी सिंह 'दिनकर' यांनी एका अभूतपूर्व साहित्याची निर्मिती केली आहे. १९५० च्या आसपास लिहिलेल्या या कविता अजूनही लोकांना तोंडपाठ आहेत. सर्व व्याख्याते याच कवितांचे उदाहरण अजूनही देतात. म्हणूनच "दिनकर" यांना राष्ट्रकवि म्हणतात. ज्यांनी हे पुस्तक अजून वाचले नाही, त्यांच्या पुस्तक वाचनाची अजून सुरवातच झाली नाही असं मी समजतो. त्यांच्या कवितांमध्ये विद्रोह आहे, आक्रोश आहे, क्रांती आहे, उत्कट प्रेम आहे आणि शृंगारिक भाषा आहे.  दिनकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी आहेत.

एकूण सात "सर्ग"(खंड) आहेत. हळू हळू प्रत्येक खंडात कर्णाचे भावविश्व उलघडत जाते. मनातल्या विचारांना एक प्रवाह मिळतो. पहिल्या खंडात कर्ण आपली कला दाखवण्यासाठी क्रीडांगणात येतो.. तिथे होणारा त्याचा अपमान आणि दुर्योधनाने त्याला अंगदेशाचे राज्य देऊन केलेला सत्कार कवीने अतिशय सुंदर वर्णिला आहे. दुसऱ्या खंडात कर्णाचे शिक्षण दाखवले आहे. परशुराम आणि कर्ण यांच्यातील सुप्त नातेबांध वाचताना मनात विचारांचा कोलाहल घर करत राहतो. तिसरा खंड बहुचर्चित आहे.. प्रचलित आहे.. सर्वांना तोंडपाठ आहे.. माहिती आहे. कृष्ण कौरवांना चेतावणी देऊन युद्ध ठरवतो तो क्षण, त्या ओळी कोणीच विसरू शकत नाही. चौथा खंड इंद्रदेव कर्णाची "कवच-कुंडले" कशी घेऊन जातात त्यावर आहे. पाचव्या खंडात कुंती-कर्ण यांच्यातील संभाषण आहे. आई मुलाचे संवाद कधी कानपिचक्या घेतात, तर कधी हळवे कातर करून सोडतात. सहाव्या खंडात युद्धाचे वर्णन आहे. आणि शेवटच्या सातव्या खंडात कर्णाचा मृत्यू कवीने इतक्या प्रचंड शब्दात मांडला आहे की वाचताना अंगावर काटा येतो. त्यातील शेवटचा कृष्ण, अर्जुन आणि कर्ण यांच्यातील युक्तिवाद अतिशय रोमांचकारी आहे.

वानगीदाखल काही कवितांचे कडवे मी इथे टाकत आहे, परंतू संपूर्ण पुस्तकं वाचण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे.

सच है, विपत्ति जब आती है, कायर को ही दहलाती है,

शूरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते,

विघ्नों को गले लगाते हैं, काँटों में राह बनाते हैं।

जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है।

प्रासादों के कनकाभ शिखर, होते कबूतरों के ही घर,

महलों में गरुड़ न होता है, कंचन पर कभी न सोता है।

बसता वह कहीं पहाड़ों में, शैलों की फटी दरारों में।

हाय, कर्ण, तू क्यों जन्मा था? जन्मा तो क्यों वीर हुआ?

कवच और कुण्डल-भूषित भी तेरा अधम शरीर हुआ।

धँस जाये वह देश अतल में, गुण की जहाँ नहीं पहचान,

जाति-गोत्र के बल से ही आदर पाते हैं जहाँ सुजान।

अशा काही ओळी वाचल्यानंतर कोणीही या पुस्तकाच्या प्रेमातच पडेल यात मला शंका वाटत नाही. अगदीं शेवट कर्णाच्या मृत्यूनंतर "रश्मिरथी" या शब्दाचा खरा अर्थ कवीने आपल्यासमोर मांडला आहे. तो समजल्यावर पुस्तकाच्या नावाची.. त्यावरील मुखपृष्ठाची वेगळीच अनुभूती होते. आता मला वाटते तुम्हाला हे पुस्तक वाचल्याशिवाय रहावणार नाही. तुम्ही देखील या कविता वाचा आणि तुमचं अभिप्राय आम्हाला कळवा. पिढ्या न पिढ्या हे पुस्तक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यावर मला ठाम विश्वास आहे.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form