राम इक्ष्वाकुचे वंशज - अमीश त्रिपाठी | Ram Ikshvakuche Vanshaj - Amish Tripathi | Marathi Book Review

राम-इक्ष्वाकुचे-वंशज-अमीश-त्रिपाठी-Ram-Ikshvakuche-Vanshaj-Amish-Tripathi-Marathi-Book-Reviews
पुस्तक राम इक्ष्वाकुचे वंशज लेखक अमीश त्रिपाठी
प्रकाशन वेस्टलँड इंडिया समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ४०६ मूल्यांकन ४.६ | ५

भारतीय कालखंडात होऊन गेलेल्या अनेक नायकांपैकी एक पण तरीही सगळ्यांपेक्षा वेगळा असा अद्वितीय महापुरुष! मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, अमर्याद शोर्य अंगी असूनही संयमी वृत्ती बाळगणारा आणि तमाम हिंदू मनांवर राज्य करणारा राजा या पृथ्वीतलावर होऊन गेला. काहींनी म्हटलं तो देवाचा अवतार आहे, काहींनी म्हटलं की मानव योनीमध्ये जन्म घेणारा तो सर्वोत्तम पुरुष आहे तर काहींना अजूनही त्याच्या अस्तित्वावर विश्वास बसत नाही. तरीही भारत आणि भारताच्या आसपासच्या प्रदेशात त्याच्या अस्तित्वाचे ठसे आजही त्याच्या विचारांइतकेच प्रखरपणे पहायला मिळतात. अशा या महानायकाच्या, दशरथपुत्राच्या जीवनावर अमिश त्रिपाठी या लेखकानं आपल्या नजरेतून रामकथेच्या या पहिल्या भागात प्रकाश टाकला आहे. एकही युद्ध न हारलेला, चक्रवर्ती सम्राट, राजा दशरथ आणि लंकाधिपती रावण यांच्यातील करचाप येथे झालेल्या लढाईने कादंबरीची सुरवात होते. राजा दशरथाला आयुष्यात पहिल्यांदाच भोगावा लागलेला पराभव, मरणाच्या दारातून झालेली सुटका आणि नेमकी त्याच दिवशी प्रसूत होत राणी कौसल्या एका बाळाला जन्म देते. आपसूकच ह्या पराभवाचं खापर या बाळाच्या जन्मावर फोडलं जातं, कौसल्या नावडती राणी होते तर युद्धात प्राण वाचवणारी कैकयी आवडती राणी होते. भगवान परशुरामांच्या नावावरूनच या राजकुमाराचे नाव राम ठेवण्यात येतं. पुढे राणी कैकयी आणि सुमित्रेलाही पुत्रप्राप्ती होते आणि राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा चार राजपुत्रांनी अयोध्या नगरी गजबजून जाते. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चारही भावंडांच बालपण, संगोपन आणि शिक्षण रेखाटताना लेखकाने त्यांच्या तोंडी जे संवाद दिले आहेत, त्यातून त्यांची प्रगल्भता वाचकांसमोर प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. सत्तेच्या राजकारणापलीकडे असणारा त्यांच्यातला बंधुभाव, विशिष्ठ बाबतीत असणारी ठाम मते लेखकाने अचूक टिपली आहेत. नावडता राजपुत्र ते अयोध्येचा भावी सम्राट असा रामाचा रोमहर्षक प्रवास आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतो. अस्थिर झालेल्या भारतवर्षाला एक स्थिर नेतृत्व देण्याच्या कार्यात गुरू वसिष्ठ आणि विश्वमित्र यांची चढाओढ लेखकाने उत्तमरीत्या मांडली आहे. राम सीता स्वयंवर, सीतेचे अपहरण हा एक काळानुरूप घडत गेलेला घटनाक्रम आहे की व्यवस्थित योजना बनवून खेळलेली बुद्धिबळाच्या पटावरची चाल हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचलेलंच उत्तम! विविध प्रसंगातून कथानक रंजकरित्या पुढे नेण्याची हाथोटी, रामायणाचे पारायण केलेल्या माणसालाही भुरळ घालू शकेल अशी मांडणी यांच्या बळावर ही कादंबरी सरस ठरते. घराघरात प्रचलित असलेली ही कथा अमिशच्या नजरेतून वाचताना आपली उत्कंठा टिकून राहते. मराठी, हिंदी व इंग्लिश अशा तीनही भाषेत उपलब्ध असलेलं हे रामचरित कथेतलं पहिलं पुस्तक नक्की वाचून बघा. रामायणाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी ह्या पुस्तक शृंखलेच्या माध्यमातून आपल्याला नक्की मिळेल. लहान थोर सगळ्यांनी वाचावी अशी सोपी भाषा लेखकाने वापरलेली आहे. तर आजच हे पुस्तक माघवून त्याचा आस्वाद घ्यायला आणि तुम्हाला ते कसं वाटलं हेही आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका!

अमीश त्रिपाठी यांची रामचंद्र मालिका यात पुढील चार पुस्तकं आहेत. राम - इक्ष्वाकुचे वंशज, सीता - मिथिलेची योद्धा, रावण - आर्यावर्ताचा शत्रू, आणि लंकेचा संग्राम.

गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form