रावण आर्यावर्ताचा शत्रू - अमीश त्रिपाठी | Raavan Aryavartacha Shatru - Amish Tripathi | Marathi Book Review

रावण-आर्यावर्ताचा-शत्रू-अमीश-त्रिपाठी-Raavan-Aryavartacha-Shatru-Amish-Tripathi-Marathi-Book-Reviews
पुस्तक रावण आर्यावर्ताचा शत्रू लेखक अमीश त्रिपाठी
प्रकाशन वेस्टलँड इंडिया समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ३४३ मूल्यांकन ४.६ | ५

"खलनायक असेल तरच नायकाला अर्थ आहे, जर खलनायकाचा नसेल तर नायकाचं काम काय?"
चांगल्याचा वाईटावर झालेला विजय साजरा करण्यासाठी आपण विजयादशमी साजरी करतो. आणि ती साजरी करत असताना आपण वाईटाची प्रतिकृती म्हणून रावण दहन करतो. या दहनाचा अर्थ असा कि आपल्यातले सर्व वाईट गोष्टी, विचार, विकार जाळून नष्ट करणे. असा हा जाळणारा रावण नक्की आला कुठून, तो होता कोण त्याच आणि सर्व वाईट गोष्टींचं नक्की नातं काय? रावण खरंच राक्षस होता का? कि तो एक मनुष्यच होता ज्याला परिस्थितीने राक्षस बनवलं? आजही आपल्या समाजातल्या काही घटकांना व विशिष्ट गटाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते, याच कारण नक्की काय असावं? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. रामचंद्र मालिकेतील हे तिसरं पुस्तक ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करत आपल्याला रावणाची ओळख करून देत. एका ऋषीच्या पोटी जन्मलेला हा मुलगा जन्मताच असा होता का? भारत भूमीत जन्म घेतलेला हा मुलगा आपल्याच भूमीचा इतका बलाढ्य शत्रू कसा होतो? त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनाक्रमामुळे तो कसा बदलत जातो याच हृदयद्रावक वर्णन या पुस्तकात अमिश त्रिपाठीने केले आहे. आपल्या सर्व दुर्गुणांच्या जोरावर सगळा आर्यावर्त स्वतःच्या अंमलाखाली आणण्यासाठी जी धडपड रावणाने आयुष्यभर केली त्याच्या अवतीभोवती पुस्तकाचं कथानक फिरत राहत. कुंभकर्णाच्या जन्मापासूनच खऱ्या अर्थाने रावणाचा रावण म्हणून प्रवास सुरु होतो. जन्मताच व्यंग असणाऱ्यांना त्याकाळी लोक नागा म्हणून ओळखत असत. असे हे दोन्ही नागा बंधू मृत्यूला चकवा देऊन आपल्या पित्याच्या आश्रमातून मामा मारीचच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी होतात. कोणाचाही आधार मिळत नसल्यामूळे आपल्या लहान परिवाराची सगळी जबाबदारी रावण स्वतःच्या अंगावर घेतो. असंच लपूनछपून जगात असताना त्याला कन्याकुमारी नावाची देवी भेटते. ती त्याला "तू आहेस त्यापेक्षा चांगला होऊ शकतोस, त्यासाठी प्रयत्न कर" असा सल्ला देते पण आयुष्याला आणि रावणाच्या नशिबाला कदाचित हे मान्य नसतं. त्याने ह्या पृथ्वीवर खलनायक म्हणूनच उदयाला यावं असं नियतीला वाटत असावं म्हणून कि काय रावणाचं आयुष्य अनेक वळणं घेत राहतं. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय आणि ते हि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये याच उत्तम उदाहरण म्हणून आपण रावणाकडे पाहू शकतो. त्याची जिद्द, चिकाटी आणि अफाट बुद्धिमत्ता यांच्या जोरावर तो लंकाधिपती होतो. रावण हा वृत्तीने जरी राक्षस असला तरी त्यालाही एक हळवा कोपरा लाभला आहे. अनेक कलागुण त्याच्या अंगी फक्त भिनलेलेच नसून तो त्या सर्वात पारंगतही आहे. एका तटस्थ भूमिकेतून त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते; पण म्हणून त्याच्या पद्धती बरोबर होत्या असं मुळीच नाही. आयुष्याने दुसरी संधी दिल्यावर ती खुल्या मनाने स्वीकारण्याचे औदार्य त्याच्या अंगी आहे पण कपटी काळाला ते मंजूर नाही. काहीना काही बाधा आणून नियती त्याच्यातल्या राक्षसाला चिथावण्याचं काम करत असते. राम, सीता आणि रावण यांच्या पात्र बांधणीच काम रामचंद्र या मालिकेतून अमिश ने उत्तमरित्या साधलं आहे. इतिहास आणि दंतकथा यांची सांगड घालून लेखक आपल्याला ह्या पात्रांची नव्याने ओळख करून देतो. रावण आणि सीता यांचं नक्की नातं काय असतं, रावण तिचं अपहरण का करतो; हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. अमिशने साकारलेली ही पुस्तकमालिका रामायणासारख्या एका प्राचीन महाकाव्यावर व त्याच्यातल्या पात्रांवर नव्याने प्रकाश टाकते. प्रत्येक पात्राबद्दलची एक विशिष्ट कथा मांडण्यात आल्यामुळे पुस्तकात ती बोलकी आणि खरी वाटू लागतात. मराठी, इंग्लिश आणि हिंदी अशा तिन्ही भाषेत ह्या पुस्तकमालिकेचे भाषांतर झाल्यामुळे सर्व स्तरातल्या वाचकांना त्याचा आस्वाद घेणं अजून सोपं झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाषेतून ह्या पुस्तकांचं वाचन करू शकता, तुम्हाला माहित असलेल्या अनेक पौराणिक नायक, खलनायकांना त्यानिमित्ताने जवळून अनुभवू शकता. त्यामुळे असा हा रंजक रावण अंक तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका.

गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form