पुस्तक | पानिपत | लेखक | विश्वास पाटील |
---|---|---|---|
प्रकाशन | राजहंस प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ६१५ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
जिथे मराठ्यांची एक संपूर्ण पिढीच्या पिढीच कापली गेली, अशी महाभयंकर व लक्षवेधी झुंज मानली जाते ती म्हणजे "पानिपत". इतिहासाच्या पानांना गवसणी घालणे म्हणजे अतिशय अवघड काम. पण विश्वास पाटलांनी अतिशय सुरेखरित्या त्याची मांडणी केली आहे... इतिहासाचे अनेक बारकावे त्यांनी अगदी बिनचूक टिपले आहेत व तसेच विविध ढंग असलेल्या त्यातील सर्वच व्यक्तिरेखा त्यांनी सहज उलघडून लिहल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून पानिपत पाहताना कौरव-पांडव संगर तांडव, खरच कसे झाले असेल याचा अनुभव नक्कीच तुम्हाला आल्या शिवाय राहणार नाही.
घटनेची फोड करून सांगताना त्यांनी आधीच्या कालखंडाबद्दल अगदी सुरेख ओळख करून दिली आहे, त्यामुळेच युध्दातील सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर कुठेही अज्ञात असल्याचा भास होत नाही. तसेच या विक्राळ, विध्वंसक घटनेनंतर मराठी इतिहासावर त्याचे उमटलेले पडसाद त्यांनी सुरेख टिपलेले आहेत. नानासाहेब पेशवे गादीवर असताना झालेला गृहकलह, पश्चात सदाशिवराव भाऊ आणि राघोबादादा यांच्यातील नाजूक संबंध. राजकीय, सामाजिक आणि पारिवारिक समस्यांनी ग्रासलेली पेशवाई आणि त्यातच अफगाण चा एक मग्रूर लढवय्या (अहमद शाह अब्दाली) दिल्ली काबीज करण्यास निघतो. मराठी सेनेने अटकेपार फडकवलेल्या भगव्याला ग्रहण लागण्याची चिन्हं पाहता, मराठी सेनेने दिलेला लढा हा नक्कीच भव्य-दिव्य आहे, असेच म्हणावे लागेल.
पुस्तकात अनेक व्यक्तिरेखा आहेत. डोळ्यात आग आणि मवाळ हृदयाचे भाऊ असो, की नुकतेच मिसरूड फुटलेल्या जवानीतील विश्वासराव. मस्तानी बाईंचे साैंदर्य आणि राऊंचे धाडस अंगी भिनवलेले समशेर बहाद्दर असो, वा एका घावात माणसासोबत घोड्याचाही तुकडा करणारे मल्हारराव होळकर. आपल्या लांब पल्ल्याच्या तोफांनी दुश्मनास गार करणारा इब्राहिम खान गारदी असो, वा तळपत्या तलवारीचे.. नि विचारांचे जनकोजी शिंदे. प्रत्येक व्यक्तीच्या अनेक छटा लेखकाने लीलया मांडल्या आहेत. त्यांचे वर्णन करताना नक्कीच सप्तरंगी इंद्रधनुष्य विविध रंगांनी भरूनही प्रत्येक रंगाचा एक वेगळा परिणाम असतो, एक जागा असते असच जाणवतं.
पुस्तक वाचताना आपण इतिहास जगत असल्याचा भास नक्कीच तुम्हाला उस्फुर्त करत राहील. पेशव्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील तख्ताच्या या अविस्मरीय लढाईत मराठी सेनेचा पराक्रम डोळे विस्फारून टाकतो. याचवेळी जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत, रसद पुरवठा तोडलेला असताना, चार-चार दिवस अन्नाचा कण देखील नसताना.. तुलनेत आपल्याहून कितीतरी अधिकपट संख्येच्या सैन्याशी अनुशापोटी सुतळी चीलखतानिशी अंगात महादेव अवतरलेल्या मराठी सेनेचे शौर्य पाहताना... भाऊसाहेब म्हणतात,
"तोफगोळे संपले असतील तर, माझं मुंडकं तोफेस द्या.. पण सैन्यास सोडू नका"
तिथे भल्याभल्यांना अंगावर काटा रेंगाळल्याचा भास होतो. कापरे भरलेला अब्दाली बायकामुलास अफगणाला रवाना करतो आणि म्हणतो "क्या खाते ये मरहट्टे?" तेंव्हा उर भरून आल्याशिवाय राहत नाही.
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती, तसे मराठे गिलचे साचे, कलींत लढले पानपती॥
मराठी इतिहास, जुने डावपेच आणि प्रत्येक स्वभावाच्या विचारांची सरबत्ती तुम्हाला पुस्तकात नक्कीच गुंतवून ठेवते. कोणत्याही वाचकास आवडेल अशीच ही कादंबरी आहे. यातून इतिहासच नाही तर स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देण्यासही नक्कीच मदत होईल असे मला वाटते. आयुष्यात एकदातरी नक्की पानिपत वाचाच.
-© अक्षय सतीश गुधाटे.