पुस्तक | लंकेचा संग्राम | लेखक | अमीश त्रिपाठी |
---|---|---|---|
प्रकाशन | वेस्टलँड इंडिया | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ४८० | मूल्यांकन | ३.४ | ५ |
रामचंद्र मालिकेतल्या मागच्या तीन पुस्तकांमधून आतापर्यंत आपण राम, सिता आणि रावण या तिन्ही मुख्य पात्रांचा परिचय वाचला असेल. याच मालिकेतल्या शेवटच्या आणि चौथ्या भागात आपण लंकेच्या युद्धाबद्दल वाचणार आहोत. पौराणिक रामायणातील युद्धापेक्षा या पुस्तकातील युद्ध पूर्णपणे वेगळं आहे याची वाचकांनी नोंद घ्यायला हवी. लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीचा, दंतकथांचा आणि ऐतिहासिक प्रमाणांचा सुरेख संगम या पुस्तकातून जुळवून आणला आहे. सीतेच्या अपहरणापासून सुरू होणारी ही कादंबरी रावणाच्या मृत्युपाशी येऊन थांबते.
सीता-हनुमान भेट, वाली-राम संघर्ष, रामसेतूचे निर्माण, लंकेवर आक्रमण, लक्ष्मण मूर्च्छा असे सगळे पौराणिक प्रसंग अमिशने आपल्या शैलीत रेखाटले आहेत. कुठल्याही चमत्काराचा पुरस्कार या ठिकाणी लेखक करत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळे प्रसंग विशिष्ट आधारांच्या अवतीभोवती रंगवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. युद्धाची रणनीती असो, लंकेत घुसण्याचे वेगवेगळे मार्ग असोत ह्या सगळ्यांबद्दल अतिशय सूक्ष्म वर्णन या पुस्तकातून मांडण्यात आलं आहे. मूळ प्रसंगाना कुठलाही धक्का लागू न देता एका वेगळ्या धाटणीमध्ये त्यांची मांडणी करण्यात आली आहे. रावण सिता यांच्या ओठी लेखकाने जे संवाद दिले आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. असे प्रसंग वाचताना आपल्यालाही रावणाबद्दल आस्था वाटू लागते.
राम, लक्ष्मण आणि वानरसेना यांच्या पराक्रमावर रामायणाचं युद्ध लढलं गेलं आहे असंच आपण आजवर वाचत, ऐकत आलो आहोत. अमिशने माञ चारही भावांच्या विविध कौशल्याचा पुरेपूर वापर युद्धप्रसंग रेखाटण्यात केला आहे. भरत-इंद्रजित युद्ध असो वा सेतू उभारणीत शत्रुघ्नच्या स्थापत्यशास्त्राचे ज्ञान असो, असे अनेक अनपेक्षित प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात. या सगळ्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण मूळ रामायणाचा आधार घेतलेलाच बरा.
आधीच्या तिन्ही पुस्तकांत लेखकाने सर्व अनुषंगाने दमदार पात्र रेखाटली आहेत. त्याच पात्रांच्या अवतीभोवती हे ही पुस्तक फिरत राहतं. युद्धाच्या तयारीबद्दल खूप बारीकसारीक गोष्टी लेखकाने लक्षात आणून दिल्यामुळे पुस्तक थोड लांबल्यासारखं वाटू शकतं. पुस्तकाच्या मध्यापर्यंत वाचक अलगद पुढे सरकत राहतो, पण उत्तरार्धात तो सहजपणा तितकासा आढळत नाही. अशा काही गोष्टी सोडल्या तर मूळ कथानक शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्यात नक्कीच सक्षम आहे. रामाच्या उदारपणाचा, युद्ध कौशल्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येत राहतो. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी व लंका युद्धाकडे एका वेगळ्या अनुषंगाने पाहण्यासाठी आपण हे पुस्तक नक्कीच वाचू शकता. आणि वाचल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आले ते आम्हाला अभिप्रायाद्वारे कळवा.
-© गिरीश अर्जुन खराबे.