पुस्तक | कुणा एकाची भ्रमणगाथा | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २२४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
नर्मदा परिक्रमेला निघालेल्या एका फकिराची ही कथा आहे. त्याला नाव नाही.. नाही म्हणजे आता एका उंचीवरून पाहताना.. स्वतःला नाव द्यावं असं वाटलंच नसेल. म्हणूनच "गोनीदांनी" या पुस्तकाला समर्पक नाव दिलं आहे असं वाटतं.. "कुणा एकाची भ्रमणगाथा". नावाप्रमाणेच पुस्तकाच्या मुखृष्ठावरील नर्मदेच्या तीरावरील उमटलेली पाऊले.. व त्यावर पडलेलं पान, राहून राहून मनात प्रश्न तयार करत राहत. उमटलेली पाऊले स्वतःची की त्या अनामिक ओढीने तयार झालेल्या यशोदेची. आणि समजा ती यशोदेची असतील तर त्यात अडकलेला हा फकीर कसा साकारला आहे. पावलांवर असलेले पान.. तुळशीपत्र तर नाही ना?? असे प्रश्न माझ्या मनाला पुस्तक वाचून झाल्यावर देखील पडलेले आहेत. यामुळे या पुस्तकाने माझ्या मनात एक विशेष धृवपद घेतले आहे.
जेमतेम दोन ते तीन पात्र.. आणि त्याच्याच अवतीभवती फिरणारी कथा. नर्मदा परिक्रमेतले काही किस्से.. काही प्रसंगांचे हुबेहूब वर्णन आपल्याला मैय्याच्या तीरावर घेऊन जाते. आल्हाद लाटांसमवेत आपणही तरंगु लागतो. तिरावरच्या वाळूत आपलेही पाय अडकतात. निसर्गाचे उत्तम वर्णन मनाला पुस्तक वाचतांना आनंदीत करत राहते. भेटलेल्या माणसांना नायकाबद्दल वाटणारे भाव लेखकाने अगदी चपळाईने टिपले आहेत. अनोळखी व्यक्तींनी अनोळखी प्रतिसाद देणे.. गैरसमज करून घेणे आणि पडताळणी साठी परिक्षा घेणे. अशा अनेक प्रसंगांना तोंड देत कथा पुढे सरकते.
परिक्रमेतला प्रत्येक भाव... प्रत्येक अनुभव समृद्ध करत जातो. त्यातच मध्ये एका मठात विश्राम होतो.. तिथे वाहवा झाल्यावर.. पुढे परिक्रमा सुरू राहते.. पण आलेल्या अनुभवातून सिध्द होऊन पुढे अमरकंटक ला जाताना, एका मठात विधवा यशोदेच्या सानिध्यात काही काळ राहताना. एक अनामिक त्यांच्या वाटेतील अडथळा बनते. गतकाळातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळून जातात. अवघ्या तेराव्या वर्षी देशासाठी सोडलेले घरदार.. गाव.. अचानक पुढ्यात येते.
अशी सगळी चलबिचल सुरू असतानाच... संन्याशाने कशात अडकू नये असे वाटून... एकमेकांची ओळख पुसून पुन्हा लख्ख प्रकाशाकडे विषण्णपणे निघालेला संन्यासी आपल्या मनात घर करतो. पुस्तक वाचताना अनेक भावना अनावर होतात... तसेच शास्त्र काट्याच्या कसोटीत कश्या उतरतील हे पाहताना पुस्तक अजूनच सुंदर होत जात. सर्वांच्या संग्रही असावं व वरचे वर पारायण करावं असं पुस्तक आहे. तुम्ही देखील लवकरात लवकर वाचून तुम्हाला हे पुस्तक कास वाटलं ते मला नक्की कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.