पुस्तक | हुंकार | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १७७ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
वपु म्हणतात,
"दैनंदिन जीवनातील हे कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत, हीच त्यांची व्यथा. मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शीणवटा कुणाला कळत नाही, सावरणंही समजत नाही! नव्या उमेदीनं, मागं पाहत-पाहत प्रवास चालू असतो; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा! त्यांच्या या कथा."
हुंकार या कथा संग्रहातल्या शेवटच्या पानावरच्या या ओळी थोडक्यात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सार व्यक्त करून जातात. वपु म्हणतात तसं यात आपण सदैव एकटेच असतो. त्यातून तरून जाण्याशिवाय दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच की काय, वपुंना जीवन कळाले होते असं आपण सहज म्हणून जातो. जवळपास सतरा कथांनी साकारलेला हा कथा संग्रह फार मजेशीर, मार्मिक व मानवी जीवनशैलीतील अनेक पैलूंवर दृष्टिक्षेप टाकणारा आहे. स्वप्नाळू वृत्तीची दोन वेगवेगळया प्रकारे मांडणी करत लेखक हुंकार ही पाहिलीच कथा खुलवतो. एकीकडे स्वप्नांमुळे दुःखी असलेला लेखक तर दुसरीकडे त्याच स्वप्नांत आपलं सौख्य शोधणारा मित्र यांची सुबक मांडणी करत लेखक स्वप्नांच्या धुंदीची ताकद दाखवून देतो.
मांजर, शिकार, सोनाराने कान टोचले दुसऱ्यांदा, बुमरँग, हॉलिडे स्पेशल अशा काही गमतीशीर कथांमधून आपले मनोरंजन देखील करतो. लेखनाची विशिष्ट शैली असल्यामुळे त्यात गंमत काय आहे; हे फक्त शेवटच्या ओळींमध्येच वाचकाच्या लक्षात येते. एकंदर हे वाचणच मजेशीर होत जातं. वाचकाला खिळवून ठेवणं हीच तर वपुंची खासियत आहे.
निर्णय, पहारा, कैफ या सारख्या मार्मिक कथा मांडताना लेखक आपल्यातल्या संवेदनशीलतेला साद घालत असतो. त्यात हरवण्याची मज्जा, त्यातील विषयाची गंभीरता याची हळूहळू वाचक म्हणून आपल्याला अनुभूती येत जाते.
"माणूस निराळा वागतोय असं वाटत असतं आपल्याला. तो बिघडला, कामातून गेला असं आपण पटकन म्हणतो. पण तसं नसतं. त्या सर्वांचा अर्थ, तो आपल्याला हवा तसं वागत नाही, एवढाच असतो."
दाजीसाहेबांच्या अनुभवातून उमटलेले हे बोल तंतोतंत खरे आहेत. आपल्या सुनेला समजावताना त्यांनी सांगितलेलं शहाणपण हा त्यांचा स्वानुभव आहे हे कथेच्या शेवटी आपल्या लक्षात येते.
माणसाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, काळानुसार त्यात होणारे बदल, नवनवीन दृष्टिकोन अन त्यातून होणारी फजिती, घडणारी अद्दल या सगळ्यांचा मेळ या कथासंग्रहातील कथांमध्ये आपल्याला सापडत जातो. ज्या काळात या कथा लिहल्या गेल्या आहेत तो काळ व आजचा काळ यांत तफावत असली तरी मिळणारा बोध मात्र सारखाच आहे.
"चाफ्याच्या सुगंधानं धुंद होणारा माणूस; मोगऱ्याच्या वासाला विसरतो असं थोडीच आहे?" माणसाच्या विलासी वृत्तीच दर्शन घडवताना वपु हे लिहितात. अशा कित्येक वाक्यांनी, प्रसंगांनी त्यांनी हा कथासंग्रह उजळवून टाकला आहे.
"नेहमी दिसणारं आकाश एखाद्या दिवशी भव्य वाटतं. पाण्याला पण कधी कधी निराळी चव येते,नेहमीच्या स्पर्शात निराळी स्निग्धता वाटते. आपल्या मनाची भावनाच काही काही वेळा वातावरणात मिसळते. एकरुप होते, आणि मग आकाश भव्य वाटतं–पाण्याची चव बदलते– स्पर्शात स्निग्धता येते. ती भव्यता– ती चव– ती स्निग्धता आपल्याच मनाची असते. सगळं विश्व आपलं वाटतं, कारण आपलं मन त्यात सूक्ष्म वावरत असत."
भावविश्वात हरवलेल्या मानवी मनाची ही उलथापालथ वपु किती सहज आणि मोजक्या शब्दांत मांडतात त्याचा हा एक छोटासा नमुना.
असाच आपल्या वाचनाचा खजिना वाढवायचा असेल तर हुंकार वाचायला हवं. त्यात वपुंना सापडलेला मानवी मनांचा बांध आपणही समजून घ्यायला हवा. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून वपु सबंध कथा उभी करतात हे त्यांच वैशिष्टच! तुम्ही देखील ही मेजवानी लुटायला विसरू नका!
-© गिरीश अर्जुन खराबे.