पुस्तक | गवत्या | लेखक | मिलिंद बोकील |
---|---|---|---|
प्रकाशन | मौज प्रकाशन गृह | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ४१० | मूल्यांकन | ४.९ | ५ |
"माणसाजवळ जर काही असेल ना तर फक्त इतिहास. दुसरं काही नाही. उद्या काय होणार माहित नाही, पण काल काय झालं ते नक्की माहितीये. आपली संपत्ती जी काही आहे ना. ती हीच."
पौगंडावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना कितीतरी प्रश्न मनात जन्म घेत असतात. एकवेळ अशी येते की शिक्षण पूर्ण होतं आणि आपसूकच वाटू लागत की आता नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर ह्या संक्रमणाच्या काळात योग्य दिशा मिळाली तर तारुण्याची नाव कुठे भटकत नाही. त्यामुळे या काळात माणसाला गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची. हा दिशादर्शक वेळीच सापडला की आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. गवत्या हि अशाच एका तरुणाची कथा आहे वा त्याने जगलेले दिवस आहेत; असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गवत्या ह्या कादंबरीमधून आनंद नावाच्या एका तरुणाच्या जगण्याची, स्वतःला शोधण्याची धडपड लेखक मिलिंद बोकिल यांनी मांडली आहे.
कोणत्याही नोकरीची सुरवात करताना आपल्याला ती आवडेल का? त्यात आपलं मन रमेल का? असे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडले असतील, काहींना अजूनही पडत असतील. कित्येक जण आवडत नसलं तरी पण गरज आहे म्हणून त्याच नोकरीला चिकटून असतील. आनंदच्या बाबतीत मात्र वेगळं आहे नोकरीत मन नाही रमलं तर ती सोडून देण्याच धाडस आणि मुभा त्याला लाभली आहे. सुदैवाने एखादी नोकरी आता सोडायची ठरल्यावर, त्याला लगेच दुसरी संधी उपलब्ध झालेली असते. लॅब टेक्निशियन, सेल्स मॅन यासारख्या कोणत्याच नोकरीत त्याला रस वाटत नाही. मग एका सामाजिक संस्थेच्या कामासाठी सोंडूर नावाच्या गावाला जाऊन राहण्याची संधी त्याला मिळते. मुंबईसारख्या ठिकाणी राहणारा माणूस गावाला नोकरीसाठी जातो हे ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी आनंद त्यासाठी तयार होतो. तसही इथल्या कोणत्याच गोष्टीत आपलं मन लागत नाही आणि माणसांच्या मानाने अपुऱ्या असलेल्या घरात त्याला राहावंस वाटत नसल्यामुळे; तो सोंडूरला जायचा निर्णय घेतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरवात होते पुस्तकाच्या शीर्षकाची - गवत्याची!
सोंडूरने दिलेली सगळ्यात सुंदर भेट म्हणजे "गवत्या". गवत्यामुळे त्याला संस्थेच कामही आवडू लागतं. सोंडूर हे गाव छोटं असल्यामुळे आणि संस्था गांधीजींच्या विचारांची असल्यामुळे आनंदची लवकरच गावकऱ्यांशी ओळख होते. अनेक प्रकारचे मित्र त्याच्याशी जोडले जातात. आपल्या भटकंतीच्या आवडीचा पुरेपूर उपयोग आनंद इथे करून घेतो; गावातल्या आणि गावाच्या आसपासच्या सगळ्या जागा पिंजून काढतो. हळूहळू आसपासच्या गावात ये-जा वाढते, ओळखीचा आणि शिक्षणाचा उपयोग तो गाववाल्यांच्या भल्यासाठी करू लागतो. नकळत सोंडूर आणि इतरत्रच्या परिसरात मन रमत असतानाच त्याची गुरुजींशी ओळख होते. गुरुजी हे अत्यंत प्रभावी असं व्यक्तिमत्व आनंदच्या आणि आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. गुरुजींना भेटल्यानंतर त्याची सर्व बैचैनी, नकारात्मकता नाहीशी होऊन तो नावाप्रमाणेच आनंदी राहू लागतो. गुरुजींच्या सहवासातला एक न एक क्षण अविस्मरणीय असून आपणही नकळत सकारात्मकता आत्मसात करू लागतो. असा हा एकंदर संवाद म्हणजे जागेपणीची विपश्यनाच आहे. ह्या विपश्यनेचा मंत्र सांगताना गुरुजी म्हणतात,
"आपण अशाच सवयी लावायच्या की, ज्यामुळे आपलं कधीही, कुठंही अडलं नाही पाहिजे."
असेच दिवस जात असता एक अमेरिकन संशोधक भारत भेटीला आलेला असताना आनंदला भेटतो. त्याच्या एकंदर कामाच्या पद्धतीमुळे आणि संशोधकाला अमेरिकेत अशाच एका माणसाची गरज असल्या कारणामुळे तो आनंदला नोकरीसाठी विचारतो. आनंद अमेरिकेला जातो का? गेला तरी जाताना, गाव सोडताना त्याचं काय होत? गवत्याच त्याच्या आयुष्यातलं महत्व नक्की काय आहे? हे सगळं समजून घेण्यासाठी आपण पुस्तक वाचलं पाहिजे. हे पुस्तक वाचताना, गोष्टी समजून घेताना प्रत्येक माणूस वेगवेगळ्या निष्कर्षाला येऊन पोहोचेल असं मला ठामपणे वाटतं. कारण आपल्या प्रत्येकामध्ये हा आनंद लपलेला आहे, त्याच्या भावनांशी, प्रश्नांशी आपण सहज जोडले जाऊ शकतो. तुमच्या मानसिक संगोपनासाठी हे पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरेल. कोणत्याही पानावर, ओळीवर हे पुस्तक तुम्हाला थोडंही निराश करणार नाही.
"मिलिंद बोकील" यांच्या सुप्त लिखाणातून हि कादंबरी नदीप्रमाणे अनेक नागमोडी वळणे घेत पदोपदी मनाला सुपीक करत पुढे पुढे जाते. मिलिंद सरांची "शाळा" वाचल्यानंतर जशी आपल्या मनातही एक वेगळीच शाळा भरते त्याप्रमाणेच गवत्या वाचल्यावर आपल्या मनात एक सुखद अशी भावना निर्माण होईल. हवेत तरंगणाऱ्या पिसाप्रमाणे आपण बऱ्याच वेळ त्यावर तरंगत राहतो. दैनंदिन जीवनात जगताना आपल्याला गवत्या आणि आनंद आठवत राहतात. असा हा गवत्या प्रत्येकाच्या संग्रही असला पाहिजे, त्याच्या रसग्रहणातून आपण तरंगत राहिलं पाहिजे. तुम्हीही हा गवत्या वाचा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला अभिप्रायाद्वारे कळवा.
"आपल्याजवळ ही आपली स्तब्धता आहे. शांतता आहे. तल्लीनता आहे. आणि आपण ती तशीच ठेवायला पाहिजे. कारण आपलं म्हणून जे आहे. ते फक्त तेच आहे. दुसरं काही नाही. बाकी प्रत्येक गोष्ट बाहेरची आहे. पण आपल्या मनाची स्थिती मात्र आपली आहे. म्हणून ती आपण अशी मस्त ठेवूया. म्हणजे आपल्याला कसलीच फिकीर नाही. चिंता नाही. आपण सगळ्यापासून मुक्त आणि आतल्या आत सुखी."
लेखकाच्या या शब्दांनंतर मी काही लिहिणं आता मला योग्य वाटत नाही. परंतु, गवत्या म्हणजे कोण? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.. गवत्या हा कोणी माणूस किंवा वस्तू नाही; तर मग तो आहे तरी कोण? हे मात्र तुम्ही पुस्तक वाचूनच शोधावं असं मला वाटतं!
-© गिरीश अर्जुन खराबे.