पुस्तक | द इंग्लिश टीचर | लेखक | आर. के. नारायण | उल्का राऊत |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २२४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
आपण बहुतांश वेळी एकटेच असतो. दुःख कोणाच्या वाट्याला असत नाही? सर्वांच्याच असतं.. आणि सर्वसामान्यांच्या वाट्याला तर ते अधिक येतं अस मला वाटतं. "आर. के. नारायण" म्हटलं की आपल्याला आठवतात "मालगुडी डेज". त्यांची खास आणि विशिष्ट प्रकारची कथेची मांडणी. आपल्या आजूबाजूला घडणारी.. आपल्यासोबत पुढे जाणारी आणि शेवटी मनाचा ताबा घेऊन.. कधीच संपू नये अशी वाटणारी कथेमुळे, त्यांचं लेखन सर्वांना आपलंसं वाटतं. त्यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनात घर केलं आहे.
निखळ, निरागस, निर्मोही, निर्मळ म्हणजे आर. के. नारायण यांचं "द इंग्लिश टीचर" हे पुस्तक असं म्हणता येईल. मुळतः इंग्रजी असणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद "रोहन प्रकाशनाच्या" उल्का राऊत यांनी अतिशय सुरेख करून मराठी वाचकांसाठी एक सुंदर अनुभव दिला आहे. पुस्तकातील भाषा ही आपल्या घरातील.. रोजच्या जनसामान्यांच्या वापरातील असल्याने पुस्तक अजूनच मनाला भिडते. अश्याच एका सर्वसामान्य माणसाची ही कथा. त्रिकोणी कुटुंब. कृष्णन, सुशीला, आणि मुलगी लीला. आजूबाजूला देखील मोजकीच माणसे. शाळेत इंग्रजी शिकवणारा एक शिक्षक आणि त्याच्या आयुष्यातील काही प्रसंग लेखकाने पुस्तकात खुलवून दाखवले आहेत.
कथेचा नायक अगदी साधा.. नाकासमोर चालणारा.. त्याची अतिशय मनमिळावू आणि सुंदर पत्नी.. एक आपत्य. सुखी संसाराची गाडी मात्र प्रेमापासून सुरू होऊन अचानक एकटेपणात येऊन थांबते. त्याचीही हळु हळु सवय होते. अनेक गोष्टी अपुऱ्या राहतात. पुस्तकाच्या प्रत्येक शब्दागणिक आपण स्वतःला नायकासोबत पाहतो. त्याने पाहिलेली अनेक दिवास्वप्ने आपल्याला आपली वाटू लागतात, आणि आपल्या आयुष्याप्रमाणेच नायकाची देखील स्वप्ने तशीच अपूर्णच राहतात. ही बाब मात्र कधी खलते, तर कधी परिस्थितीची जाणीव करून देते. शिक्षण व त्यातील त्रुटी.. शिक्षणातील सृजनशीलता यावरही अनेक प्रकारे लेखकाने प्रकाश टाकला आहे. मृत्यूलाही विनोदी होऊन कसं पाहता येतं याच हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे.
झाडाला कवटाळून वाढणाऱ्या वेलीप्रमाणे कथा मधेच वळण घेते.. अनपेक्षित कल घेते आणि वाचनाऱ्याला अवाक् करते. सर्वांसोबत वावरताना मनात एकटेपणा दडवून ठेवणारा कृष्णन, म्हणजे आपणच आहोत की काय, असे वाटू लागते आणि पुस्तक वाचकाच्या वर्मी लागते. इतकी लाघवी कादंबरी.. विलक्षण कथा.. आणि लोभस पात्र तुम्हाला हे पुस्तक अनेकदा वाचायला भाग पाडतील यात शंकाच नाही. प्रत्येक वाचनप्रेमीच्या संग्रही असावी अशी कादंबरी. तुम्ही वाचली असेल तर तुम्हाला या कादंबरीबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आणि तुम्ही अजून हे पुस्तक वाचलं नसेल तर लवकरच वाचून तुम्ही मला तुमचा अभिप्राय कळवाल अशी आशा आहे.
-© अक्षय सतीश गुधाटे.