पुस्तक | दुनियादारी | लेखक | सुहास शिरवळकर |
---|---|---|---|
प्रकाशन | शशिदीप प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २७२ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
गँग म्हटलं की मन वेगवेगळ्या विचारांनी गजबजून जातं पण त्यालाच जर मैत्रीच्या परिभाषेत तोललं तर त्याहून सुखद अनुभूती दुसरी कुठलीच नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकजण या ना त्या मैत्रीच्या गँगचा सदस्य असतोच. मग त्यातून वाढत गेलेला मैत्रीचा प्रवास अन् कालांतराने तुटत गेलेल्या भेटीगाठी हेही ओघाने आलंच. जग बदललं तरी गँग च्या बनण्या बिघडण्याच तंत्र आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहील. अशाच एका गँगला केंद्र मानून सुहास शिरवळकरांनी दुनियादारीची अदभुत कथा रेखाटली आहे.
पुण्यातल्या एस.पी कॉलेजातली कट्टा गँग आणि त्यांच्या अवतीभोवती घडत जाणारी कथा लेखक म्हणतो तसं युगानयुगे चालूच राहणार आहे. काल्पनिक जरी असली तरी ती कथा आपल्या आसपास घडून गेलेली असते किंवा घडत असते, यात शंका नाही. आणि हीच दुनियादारीची खासियत आहे ज्यामुळे ती कालबाह्य होत नाही. नव्यानेच पुण्यात शिकायला आलेला श्रेयश आणि वेगवेगळ्या प्रसंगातून त्याची कट्टा गँगशी होत जाणारी मैत्री, त्यातून त्याचे बदलत गेलेले जीवनमान या सगळ्याचा विस्तृत प्रवास लेखकाने मांडला आहे. श्रेयश, दिग्या, नित्या, उम्या, अशक्या व एका वेगळ्याच प्रसंगातून त्यांना जोडले गेलेले शिरीन आणि प्रितम यांची बनलेली गँग व गँगचे किस्से लेखकाने तितक्याच मजेशीररीत्या मांडले आहेत.
डी.एस.पी अर्थात दिग्या अन् दिग्याच्या आयुष्यात होणाऱ्या उलथापालथी यांनी मन सुन्न होऊन जातं. कथेचा नायक म्हणावा असा जरी श्रेयश असला तरी दिग्याचा असलेला एकूण प्रभाव नाकारता येत नाही. त्यांच्या घट्ट जुळलेल्या मैत्रीचं पुढे नक्की काय होतं, दिग्या पुढे काय करतो असे एक ना अनेक प्रश्न मनात येऊन कथानक पुढे पुढे सरकत राहतं. आयुष्यात घडणाऱ्या अनेक वास्तव गोष्टींना दुनियादारीच्या माध्यमातून स्पर्श करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. म्हणूनच की काय दुनियादारी आज मोठ्या पडद्यावर येऊन देखील पुस्तकाची मागणी कमी झालेली नाही. एम.के.श्रोत्री सारख्या पात्रातून लेखकाने जीवनाच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन घडवले आहे. त्याच्या बद्दलची उत्कंठता शेवटपर्यंत ताणून धरण्यात लेखक यशस्वीही झाला आहे. शेवटी दिग्या नी साई यांच्या दुष्मनीतून दिग्याच होणार पतन मनाला चटका लावून जातं.
कॉलेज मधून फुलत गेलेल्या प्रेमकथा आणि त्यांचा होणारा अनपेक्षित शेवट आपल्या मनात घर करून जातो. मिनू की शिरीन या द्वंद्वात फसलेला श्रेयश नक्की कोणाचा होतो हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचनंच रास्त ठरेल. यातूनच चित्रपट आणि पुस्तकात असणारी भिन्नता मग हळूहळू आपल्याही लक्षात येत जाते. पुस्तकात असलेल्या प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र असं दुःख आहे. स्वराली सारख्या एका छोट्या पात्रालाही लेखकाने तेवढ्याच तोलामोलाने साकारलं आहे. एकंदरीतच मैत्रीनंतरचा आयुष्याचा वेगळा होत गेलेला प्रवास लेखकाने अचूक मांडला आहे. दुनियादारीच्या निमित्ताने आपण अनेक भावविश्वांना भेट देऊ शकतो, त्यांच्या व्यथा समजून घेऊ शकतो, हे मात्र नक्की.
वयात येणाऱ्या प्रत्येकासाठी दुनियादारी ही वास्तववादी भेट आहे. त्यात प्रेम आहे, मैत्री आहे, विरह आहे आणि मुख्य म्हणजे आयुष्य हेलावून टाकणारं दुःखही आहे. अशी ही दुनियादारीची कहाणी कधीही न संपणारी आहे. काळ सरकत जाईल तशी तीही सरकत राहणार आहे. थोड्या बहुत फरकाने ती घडत राहणार आहे. शिरवळकरांच्या उत्तम लिखाणातून ती साकारली हे आपल्यासारख्या वाचकांच भाग्य. एकदा सुरू केल्यावर शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही कहाणी चित्रपटाहून नक्कीच निराळी आहे. पुण्याच्या वेगवेगळया भागात आपल्या कल्पनेत ती घडत असल्यामुळे आणखीनच रंजक बनत जाते.
अशी ही भन्नाट कहाणी तुम्हीही नक्की वाचा आणि कमेंट्स मधून तुमचा अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.
-© गिरीश अर्जुन खराबे.