पुस्तक | चौरंग | लेखक | हृषिकेश गुप्ते |
---|---|---|---|
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२८ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
"बाप रे.. हे काय लिखाण आहे?" अस वाटतं हे पुस्तक वाचून. मूळात हे पुस्तक एका खास वर्गासाठी आहे, तो म्हणजे प्रौढ. प्रेम, प्रणय, वासना, नाती, भावना, हुरहूर या सर्व पार्श्वभूमीवर एक कथा तयार होते. तिला गावातल्या राहणीमानाचा, तिथल्या छोटछोट्या गोष्टींचा आधार आहे. मनमुराद, बेलगाम जगण्याचा ढंग त्यात लेखकाने अतिशय सैल हात सोडून लिहिला आहे, जो या कादंबरीचा मुळ गाभा आहे. कथा एक असली तरी प्रत्येकाच्या नजरेतून ती वेगळी कशी दिसते.. आणि खर तर ती वेगळीच कशी असते हे या कादंबरीत तुम्हाला दिसून येईल.
अशी पुस्तकं लिहिणं.. खरं तर खूप अवघड असते, त्याच कारण असं कि.. एक खूप बारीक सीमारेषा असते.. प्रेम, वासना आणि असभ्य व वखवखलेल्या भावनांच्या लिखाणात. ती रेघ ओलांडायला नको असं लेखकाच्या सतत डोक्यात असतं. आणि सोबतच वाचकांना देखील असं लिखाण नंतर आवडत नाही. या सर्व गोष्टी सांभाळून या पुस्तकात लिखाण झालं आहे. हे या पुस्तकाचे खरे वैशिष्ट आहे.
अगदी मोजकी पात्र.. राजा, राधा, दादा, सुन्या... एक घर.. एक गाव. इतक्याच भांडवलात सुरू होणारी कथा इतके वेगवेगळे वळण घेऊन शेवटी आपल्याकडे येते तेंव्हा त्यात फक्त एक व्यथा दिसू लागते. माणसाचे बाकी मुखवटे गळून पडतात तसे प्रत्येक पात्राचे मुखवटे गळून पडतात. त्याच सोबत अनेक छटा नकळत खुलतात व वेगळ्याही वाटत राहतात. रहस्य उलघडलं तरी प्रश्न कायम राहतात. अशी एक अपूर्व अनुभूती देणारी ही कादंबरी आहे. वासनेचे आणि प्रणयाचेच अनेक पदर आपल्याला दिसत राहतात आणि अचानक शेवटी त्यातून शरीर जाऊन भावना दिसू लागतात.
पुस्तकातील लिखाण एकदम सुंदर आहे. पात्रांची वर्णने अगदीच लाघवी आहेत. एक एक बारीकशी गोष्ट देखिल लेखकाने टिपली आहे, तिला विशिष्ट प्रकारे योग्य त्या परि्थितीत गुंफली आहे. त्याने पुस्तक वाचताना जिज्ञासा कायम राहते, प्रवाह तुटत नाही, आणि कादंबरी छान वाटू लागते. पुस्तकातील नाती मात्र आपल्याला एकाच घरात चालू असणाऱ्या अनेक घटनांनी कधी-कधी मुर्दाड बनवू शकतात असं वाटतं.
पुस्तक नक्कीच सुदंर आहे, पण मला प्रामुख्याने असं सांगावसं वाटतं की सगळ्यांसाठी हे पुस्तक नाही. अश्या प्रकारची पुस्तकं खूप कमी असतात. तुम्ही पुस्तक वाचल्यावर मला या पुस्तकाबद्दल तुमची प्रतिक्रिया, अभिप्राय नक्की कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.