असा मी असामी - पु. ल. देशपांडे | Asa Mi Asami - Pu. La. Deshpande | Marathi Book Review

असा-मी-असामी-पु-ल-देशपांडे-Asa-Mi-Asami-Pu-La-Deshpande-Marathi-Book-Reviews
पुस्तक असा मी असामी लेखक पु. ल. देशपांडे
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ११६ मूल्यांकन ४.९ | ५

माझंही आत्मचरित्र असावं, मला देखिल लोकांनी ओळखावं, अस सगळ्यांनाच वाटत असतं. पण सामान्य माणसाचं आत्मचरित्र कोणाला आवडेल? असाच प्रश्न मनात घेऊन सुरु झालेली ही कथा 'धोंडो भिकाजी जोशी' या एका सामान्य कारकुनाची कहानी, पुलंच्या लेखणितून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ती सर्वसमान्यांच्या हृदयात उतरते, डोक्यात हसवणुकीचा पिंगा घालते आणि रोजच्याच रटाळ अन् कष्टि कामाचे सुंदर विनोद होतात. सोबतच 'धोंडो भिकाजी' ते 'DB Uncle' हा प्रवास आपलाच असल्याप्रमाणे आपण त्यात गुंतत जातो.

आता आपल्याला समजले असेलच हे पुस्तक म्हणजे "असा मी असामी". चार सुख दुःखाच्या गोष्टी समान्यांच्या जगातील वाचताना तुम्ही हरवून जाल.

"आपल्याकडे काय म्हटलंय यापेक्षा, ते कोणी म्हटलंय यालाच अधिक महत्त्व आहे. थोर माणसं देखिल काही फारस काही निराळे म्हणतात असे नाही, पण ती थोर असतात हे महत्त्वाचं."

असल्या अनेक अस्सल वाक्यांनी आपलं मन हळवं होईल आणि बुद्धीची कवाडं उघडी होतील. रत्नागिरीतील कुटुंबाची एक झणझणीत चित्रफितच पुस्तक वाचताना उभी राहील. यावर नाटक आणि स्वतः भाईंचे कथाकथन देखील अगदी सर्वदूर प्रचलित आहे. नात्यांची सरमिसळ, त्यांच्यातील संवादांची उकल आणि मजा.. या पुस्तकाची जमेची बाजू. आई, बाबा, आत्या, काका, बायको, मुलं आणि मावशी अशा सगळ्यांची नायकाबद्दलची मते, त्यांचे टोमणे.. आपल्याला एकत्र कुटुंबपद्धतीत असलेली विण, विलक्षण प्रकारे दाखवून जाते आणि त्यातली ऊब जाणवू लागते.

एका सामान्य माणसाचे परिवर्तन, त्यातील गंमत आणि गरीब मध्यम वर्गातील लोकांची एक मिश्किल बाजू... आपल्याला या पुस्तकातून आनंद देत राहते. पुलंच्या शब्दांची फिरकी, त्यातील विनोद, वयासोबत येऊ लागलेले शहाणपण आणि सुज्ञात पिढीची कथा. स्वतःचे बालपण ते स्वतःच्या मुलांच्या बालपणाचा एक हसत-खेळत फार्स पाहून त्यातून गूढ आयुष्याचा निष्कर्ष सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय पुलंना द्यायलाच हवे. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या कहाणीतून समाजातील प्रश्न हसत-खेळत दाखवण्याची कसब नक्कीच कौतुकास्पद आहे.

शंकऱ्या, शरी, नूतन, गिरीश असा बराच खळबळा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. शंकऱ्याचे निरागस आणि मिश्कील प्रश्न मनाला पटतील, हसवतील आणि विचार करून बघितला तर "अरे खरंच!!" अशा उद्गारांनी तुम्हीच थक्क व्हाल. या सगळ्या लटांबराला सोबत घेऊन बघितलेलं नाटक आणि मावशीचे घर शोधताना झालेल अवचित शहर दर्शन म्हणजे अजबच!! बेन्सन जॉन्सन कंपनी आणि त्यातले वेगवेगळे रत्न, समाजात असलेले विविध स्वभावगुण अगदी मनमुराद जगताना दिसतात. बायकोचं आणि नायकाचं नातं, किती प्रकारचं असू शकत... याचं हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. तसेच मुलांचे शिक्षण आणि त्यातील नवनवीन प्रयोगांची गंमत अगदी मनाला समाधान देईल आणि नविण्याच्या बदलाशी एकरूप होत चाललेल्या नायकाला सलाम करावा वाटेल.

या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील संवाद. एक-एक साधे, मिश्किल, खोचक प्रश्न आणि उद्गार!! कपडे खरेदी करताना पाहिलेलं "गोरं अंग", निरागस शंकऱ्याचे बाबांबद्दलचे विचार आणि निबंध, नाटकाचा पडदा पडतो यावर तो "दांडी वरून धोतर पडतो तसा का ओ फादर?" हा प्रश्न. "कडक!! म्हणजे इतके नरम" हे नव्या पिढीचे शब्द आणि अशा अनेक वाक्यांना शोभेल आणि उलट त्याला अजून रंगत आणतील अशी विसंवादी आणि विसंगत पात्रे. बाबा, शंकऱ्या अन् बायको यांचं रसायन आणि सरोज खरे, नानू सरंजामे, प्रो. ठीगळे, आठवले-शहाडे आणि मंडळी या सार्‍यांची पुस्तकाला दिलेली फोडणी एक निराळच विश्व मनात उभी करते.

मला आत्ता, किती लिहू आणि किती नको.. असे झाले आहे. पुलंची ही एक अजरामर कलाकृती आहे. मी त्याबद्दल काय आणि किती बोलणार? आयुष्याच्या कोणत्याही दुःखातून तुम्ही जात असू द्या, हे पुस्तक हातात पडलं आणि जगण्याचा दृष्टीकोन बदलून, पोटभर नाही हसवलं तर नवलच!! मला वाटतं तुम्ही हे पुस्तक वाचाच; त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला.. हा 'असामी' कसा मी आहे ते.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form