आवरण - डॉ. एस. एल. भैरप्पा | Aavaran - Dr. S. L. Bhairappa | Marathi Book Review

आवरण-डॉ-एस-एल-भैरप्पा-Aavaran-Dr-S-L-Bhairappa-Marathi-Book-Reviews
पुस्तक आवरण लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा | उमा कुलकर्णी
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाउस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २८० मूल्यांकन ४.८ | ५

माहीत नाही पण का कोणास ठावूक, हे पुस्तक पाहिलं आणि मनात याच्या नावानेच एक उत्कंठा निर्माण झाली. नक्की काय आहे या पुस्तकात? कोणत्या विषयावर असेल? आवरण म्हणजे नक्की कशाचं आवरण? चढवलेलं की उतारवलेलं? अशा अनेक प्रश्नांची माळ मला गप्प बसू देईना. या पुस्तकाची खास बाब म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच याच्या सगळ्या प्रती विकल्या गेल्या होत्या. आणि शिवाय पहिल्या पाच महिन्यातच याला दहा वेळा पुनर्मुद्रित करावं लागल आहे, आणि यामुळे पुस्तक वाचण्याची इच्छा अजूनच तीव्र होत गेली. त्यातून एस. एल. भैरप्पा हे नाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. अभ्यासपूर्ण लेखनशैली आणि विविध गोष्टींतून आपली कथा मांडण्याची हातोटी सगळ्यांनाच ठाऊक आहे.

पुस्तक वाचायला सुरवात केली आणि सुरवातीच्या हंपीच्या वर्णनाने आणि तिथल्या प्रसंग वर्णनानेच मनाला एका कोड्यात टाकलं. विचार करायला भाग पाडलं. एका ग्रामीण भागातील मुलगी. नाव 'लक्ष्मी', पुण्यात शिक्षण, फिल्म इंडस्ट्रीत काम आणि सोबतच एका 'अमीर' नावाच्या मुलावर प्रेम. आणि त्यानंतर लग्न करून धर्म परिवर्तन करून मुस्लिम धर्म स्वीकारून तिथे 'रझिया' होऊन नव्या आयुष्याची सुरवात करते. स्वाभाविक घरच्यांचा विरोध आणि नवीन अनुभव. पण इथपर्यंत ही गोष्ट आपल्याला ओळखीचं आणि अर्धीच वाटते. पण खरं पुस्तक सुरूच इथून पुढे होतं. त्यानंतर स्वतः कादंबरी लिहिण्याचा तिचा विचार. कादंबरी मधे लिहिलेली एक कादंबरी तुम्हाला थक्क करेल.

धर्माचा इतका बारीक अभ्यास. आणि फक्त एकाच नाही तर अनेक धर्मांचा पाया जाणून घेऊन त्यातील अर्थपूर्ण गोष्टींची एक माळ लेखकाने गुंफली आहे. त्याला इतिहासाची आणि भूगोलाची जोड. अनेकांना अजूनही माहिती नसलेल्या अनेक लहान सहान गोष्टी. लिखाणातील बारकावे, इतिहासाचे तपशील आणि त्याला दिलेली पुराव्यांची जोड. संपुर्ण भारताचा इतिहास आणि साधारण पाचशे वर्षांच्या कालखंडाचा एक धावता आढावा. त्यातच औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाची झलक. टिपू सुलतान आणि बुंदेल खंडाची इतिहासातील उदाहरणे. काशी मधील आश्चर्यकारक बदल. उत्तर भारत, ते पश्चिम भारताचा इतिहासाची एक सलग माळ. तुम्हाला एकाच कथेतून पहायला मिळेल. आणि फक्त इतकेच नाही तर त्याला आताच्या चालू घडामोडींची जोड. म्हणजे अमेरिका, युरोप यांचा आपल्या देशावर झालेले काही बारीक परिणाम निरिक्षणपुर्ण मांडण्याचा प्रयत्न आपल्या डोक्याला एक वेगळ्याच प्रकारची झिंग चढवून जातो.

आपण या कादंबरीला धर्म, संस्कृती आणि आताचा चालू काळ यात एक सुंदर विणलेली माळ म्हणू शकतो. खेड्याचा चेहरामोहरा कसा बदलत आहे आणि सोबतच शहराचाही.. इतका अभ्यास आणि त्यातून असलेली कथा लिखाणाची सुंदर शैली, या पुस्तकाला एक वेगळी ओळख देऊन जाते.पुस्तकातील वैचारिक मंथनातून आपल्याला अनेक अंगी दृष्टीकोन समजतो. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या 'हिंदू' ची मला यात एक हलकी झलक दिसली, परंतू यात ती अजूनच विस्तृत प्रमाणात मांडली आहे, असंही जाणवलं. सर्वांनाच हे पुस्तक आवडेल असे नाही, पण नक्कीच अनेक गोष्टी यातून शिकू शकता. तुम्हीही वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form