पुस्तक | युगंधर | लेखक | शिवाजी सावंत |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ८५२ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
कृष्ण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो, एक असा दैवी अवतार की ज्याच्या बद्दल अनेक प्रश्न मनात असतात. नटखट आणि खट्याळ, खोडकर गोंडस बाळ, राधेवर जीवापाड प्रेम करणारा आणि गोपिकांसोबत रासलीला करणारा प्रेमी, मित्रांसोबत दहीहंडी तर तसेच अनेक मायावी शक्तींनी लहानपणीच सगळ्यांना संकटातून वाचवायला धावणारा कुमार. शब्दांच्या खेळीने आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या चातुर्याने सर्वत्र ओळखला जाणारा पण नाजूक आणि हळव्या बसुरीच्या सुरांनी अनेक जीव मंत्रमुग्ध करणारा किमयागार. कधी पळून जाऊन पळपुट्या म्हणवून घेणारा तर कधी धारदार बारा आर्याच सुदर्शन घेऊन शत्रूला आव्हान देणारा अन् शस्त्र न घेताही विनाशकाली महाभारत घडवू शकणारा कृष्ण म्हणजे कोणाच्याही आवाक्यात येणारा विषय नव्हेच.
शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या या कादंबरीचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. बारीक आणि अनेक गोष्टी या कादंबरीत अगदी व्यवस्थित मांडल्या आहेत. सगळ्या पात्रांना एक नवीन भावविश्र्व निर्माण करून दिलं आहे. प्रत्येक शब्दाचं वजन आणि त्याची पुढील वाक्यावर होणारे परिणाम या सर्व गोष्टींचं भान ठेऊन इतकी मोठी साहित्य कला जन्माला घालणं म्हणजे एक नवलच आहे. प्रसंगवर्णनाचे धनी तर ते आहेतच पण त्याच सोबत यात अनेक लहानमोठ्या गोष्टींमधून जीवन उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आहे व त्याच सोबत आयुष्याला वेगवेगळ्या वळणावरून आणि स्थितीतून पारखून व विचार करून त्यातली बारीक मजा अन् तो सप्तरंगी लोलक लेखकाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे अस मला वाटत.
खूप अवाढव्य आकाराचे वाटणारे हे पुस्तक वाचताना मात्र अगदी रोमहर्षक प्रसंग आणि विस्तृत माहिती मुळे आनंददायी आणि आवड निर्माण करणारे आहे. कृष्ण कोण होता? त्याच देवपण खरच रास्त आहे का? त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यामागची कारणे? टाकीचे घाव त्याच्याही आयुष्यात आले का? हे सारं जाणून घ्यायच असेल तर याहून चांगलं पुस्तक नाही. प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपण जपून आणि प्रत्येक विचाराला त्याची त्याची जागा मिळवून देणं हे काम अगदी सहज आणि सुंदरपणे केलं आहे. कथा माहित असलेली जरी असली तरी आपल्याला विचार करायला भाग पाडते. त्यांचे संबंध आणि पौराणिक गोष्टींचे संदर्भ यांचं मिळून बनलेले साहित्य नक्कीच विलोभनीय आहे.
मराठीतील अनेक लेखकांमध्ये अग्रणी नाव असलेल्या शिवाजी सावंत याच या विषयावरचं ज्ञान सखोल आहे हे आपण मृत्युंजय मध्ये देखील पाहिलं आहे. पुस्तक वाचताना माणसाला, आपणही एक पात्र असल्याचा भास होतो आपणही तो काळ जगू लागतो, काही दिवसांसाठी आपलीही भाषा तोच लहेजा पकडून येऊ लागते. यातच कलेच मोठेपण सिद्ध होते. वाचकांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलेल्या या कादंबरीला नक्की एकदा तरी प्रत्यक्षात अनुभवाचं.