पुस्तक | स्वेदगंगा | कवी | विंदा करंदीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २०१ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
कविवर्य विंदा करंदीकर म्हणजे एक आगळं वेगळं रसायन.. मराठी ज्ञानपीठ विजेते कवी. त्यांच्या वास्तववादी आणि सत्याच्या कास पकडून लिहिलेल्या कविता अनेक वाचन प्रेमींना तोंडपाठ आहेत. "स्वेदगंगा" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. स्वातंत्र्य काळाच्या आसपासच्या ह्या सगळ्या कविता आहेत. विंदांच्या कवितेत समकालीन घटनांचे काही पडसाद आपल्याला उमटलेले दिसतात. विंदांच्या कविता सत्यदर्शी आहेत.. अनेक कविता आपल्याला त्या काळात घेऊन जातात त्यामुळे समकालीन घटना व त्यांचे असणारे संबंध माहिती असणे अगदी महत्त्वाचे ठरते.
कवितेची धाटणी ही जुनीच आहे. त्याला मराठी संस्कार आहे. मर्ढेकर आणि माधव ज्युलियन यांची कविता विंदानी पुढे नेली असे अनेक समीक्षकांचे मत आहे ते मलाही खारे वाटते.. तसे कविता वाचतांना जाणवते देखील. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचताना समाज आणि परिस्थितीचा आढावा घेऊन गुंफलेला दुआ आपल्याला मिळेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही कवितेत क्रांतीचे आणि पिचलेल्या रयतेच्या जाणीवेची भाषा देऊन कविता बहरली आहे. अनेक कवितेत कष्टकरी कामगार व मनात घुसमट होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्ध भावनेची झलक आपलयाला पाहायला मिळते.
अनेक कविता वाचताना विंदांची मिश्किल वृत्ती डोकावताना आपल्याला दिसते. काही गोष्टी आपल्याला विनोदाने आणि व्यंगाने सहजसुलभ मांडता येते हे दिसून येते. विंदांकडे शब्दांची असणारी जाण ही मला बाकी कविंपेक्षा थोडी जास्ती वाटते.. कारण आपण जेंव्हा त्यांच्या कविता वाचतो.. त्यातील प्रत्येक शब्द अगदी चपखल वाटतो.. तीच कविता आपण लिहिली अस्ती तर तर त्यात असणारा तो शब्द आपल्याला कधीच आठवला नसता अशी मला सतत जाणिव होत आली आहे.
या संग्रहातील माझ्या काही आवडणाऱ्या कविता मी खाली देत आहे.
"स्वेदगंगा, समतेचे हें तुफान उठले, जग्ण्यामध्ये ब्रह्मानंद, मृत्यूलाही लाज आहे, सब घोडे बारा टक्के, सरोज नवानगरवाली, उन्माद, नुकते नुकते, थोडी सुखी, थोडी कष्टी, विप्रलंभ, घेरी, सखे तुझी जाईचे जीवन, किती विलक्षण, पतंग, शेवटचा लाडू, चिमुरडी, गणपतीबाप्पा, दगडातून देवाकडे, निळा पक्षी, पिशी मावशी, मला न कोठे मिळते जागा, मृद्गंध, काजवे, भावय"
किती किती म्हणून नावे घ्यावीत? प्रत्येकच कविता सुरेख आहे. यात काही प्रेमकविताही आहेत आणि काही प्रेंभांगाच्याही आहेत. कवितेची वेगळी शैली आपल्याला मोहून ठेवते. सर्वांनी एकदातरी नक्कीच वाचवा असा हा संग्रह आहे. विंदांच्या मला आवडणारा व सर्वात महत्त्वाचा वाटणारा हा संग्रह आहे.
-© अक्षय सतीश गुधाटे.