पुस्तक | सूर्याची सावली | लेखक | नितीन थोरात |
---|---|---|---|
प्रकाशन | रायतर पब्लिकेशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १६८ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
कोणत्या आई-बापाला आपल्या मुलांनी खास्ता खाव्यात असे वाटते. मुलाच्या सुखासाठी, त्याच्या भविष्यासाठी, कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. "सूर्याची सावली" ही नितीन थोरात लिखित अशाच एका कुटुंबाची कथा आहे. कथेचा नायक साजबा.. त्याला शोभेल अशी त्याची अर्धांगिनी दिनी.. आणि त्यांचा इवलासा मुलगा सुभण्या. यांच्याच अवती भोवती भुईचक्रासारखी फिरणारी कथा लेखकाने उत्तम साकारली आहे. गावाकडची भाषा.. त्यात बोलण्याचा लहेजा.. निवडलेले शब्द कादंबरीला अधिक सुंदर बनवतात.
अचानक पदरी पडलेल्या गरिबीला दोन हात करण्यासाठी, स्वतःचे गाव सोडून पायपीट करत हे कुटुंब निघते. कुठे जाणार? वाटेत काय असेल? ही वाट कुठे नेऊन सोडल? कशाचीही तमा न बाळगता.. पर्वा न करता आपल्या पोटच्या गोळ्यासाठी, वाटेतल्या अनेक परिक्षा देत, प्रत्येक समस्येवर पोराच्या प्रेमापोटी मात करत एक एक दिवस ढकलत एका अशा वळणावर येते, की जिथून त्यांचा मार्गच बदलतो. वाटेतले काटे.. फुलं होऊन त्यांच्यावर पडतात. जिथे प्रत्येक जण आपापल्या हिणवत होता.. आता अचानक तिथे सगळेच जण आपल्याला इतका मान देत आहेत, आपल्याला डोक्यावर घेऊन नाचत आहेत हे पाहून होणारा परिस्थितीजन्य बदल कादंबरीला हळू हळू तिच्यात गुंतवून ठेवतो.
पुस्तक अगदी सहज वाहत राहते.. एका मागून एक प्रसंग आपल्याला त्यांच्याच कुटुंबाचा भाग बनवतो. आयुष्यभर जिद्दीने, चिकाटीने जपलेली खरेपणाची ज्योत.. मुलाच्या प्रेमापोटी हळू हळू मालवू लागते. पाटलाचा.. फकीर होतो.. फाकिराचा देवऋषी.. आणि देवऋषीचा आता काय होणार? या प्रश्नाने आपले मन सतत पुस्तकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहते. या प्रवासातले प्रत्येक पात्र मात्र पुन्हा मूळ पदावर कसे येतात.. नशीबाच चक्र कसं चपखल फिरतं आहे.. आणि प्रत्येक पात्र त्यात "करावे तसे भरावे" ला साजेसं जगत आहें, हे मात्र या कादंबरीचे विशेष लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे. कथेतली प्रत्येक व्यक्ती फिरून पुन्हा समोर येते तेंव्हा मात्र पुन्हा कथेचा उजाळा होतो.. पुन्हा लेखकाच्या लिखाणाला दाद द्यावी वाटते.
अश्या प्रकारची पुस्तकं फार कमी वाचायला मिळतात. अशी कथा आपण सहसा चित्रपटांमध्ये पाहतो.. मोजकीच पात्र.. उत्तम कथा आणि तरीही पुढचं पुस्तक यातून घडू शकतं अशा वळणावर येऊन थांबणारी कथा.. मनाला पुस्तक संपलं तरीही चिमटे काढत राहते.
सगळ्यांनी आयुष्यात एकदातरी वाचावा, असा आई-बापाचा मुलासाठीचा संघर्ष आहे. तुम्हालाही हे पुस्तक आपलंसं वाटेल. आपल्याही आई-बापाने केलेला संघर्ष आपल्या लक्षात येईल. जबाबदारीची जाणिव करून देणारे हे पुस्तक आहे. तुम्ही वाचा आणि मला कळवा तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले. सूर्याची सावली सापडली की की नवीन सुरवातीला बळ.. हे पुस्तक वाचूनच येईल.