पुस्तक | राजा रवि वर्मा | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३०८ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
चित्रकलेशी संबंध आलेल्या प्रत्येकजणाला परिचित असणारं नाव म्हणजे राजा रवि वर्मा. भारतीय कलेचा जनक म्हणून ज्यांचा गौरव केला गेला असं हे थोर व्यक्तिमत्व. भारतीय कलाविश्वाला कलाटणी देण्याचं काम ह्या माणसाने केलं. आपल्या कादंबरीचा नायक म्हणून रणजित देसाई यांनी राजा रवि वर्मा यांची निवड केली आणि तितक्याच तोलामोलाने ती वाचकांसमोर उभी केली.
केरळच्या एका राजघराण्यात जन्मलेल्या एका राजकुमाराची हि चरित्रकथा. उपजतच अंगी कलागुण असणारा हा चित्रकार आपल्याच मामाच्या तालमीत तयार झाला. रंगछटा कशा तयार करायच्या, रंग कसे घोटायचे, चित्राची साचेबद्धता इत्यादी चित्रकलेविषयक गोष्टींच बाळकडू त्यांना लहान वयात घरातूनच मिळालं होतं. पुढे जाऊन त्रावणकोर संस्थानाच्या पाठबळाने त्यांनी आपले पुढचे चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. रवि वर्माच्या मुंबईच्या वास्तव्यामध्ये त्यांनी अनेक चित्रे रेखाटली. तिथे घडलेला एक प्रसंग रेखाटताना रणजित देसाई यांची लेखक म्हणून असलेली सिध्दहस्तता स्पष्ट झाली आहे. कलाकार म्हणून राजा रवि वर्माची इथे खरी परीक्षा होते. सुगंधा नावाच्या एका कलावंतिणीला फेर फटका मारताना पाहून राजा रवि वर्मा तिचे हुबेहूब चित्र साकारतो. पुढे जाऊन तीच सुगंधा अनेक कलाकृतींसाठी मॉडेल म्हणून समोर उभी राहते. लावण्याची खणी असलेल्या सौंदर्यवतीकडे कोणीही पुरुष सहज आकर्षित झाला असता पण देहापलिकडची ओढ असणारं नातं राजा रवि वर्माने तिच्यासोबत तयार केलं. आपल्या देव्हाऱ्यातल्या सरस्वतीची प्रतिमा ही रवि वर्मांची कलाकृती त्याच स्त्रीमुळे रेखाटली गेली आहे असंही म्हटलं जातं.
पुराणकथांना चित्ररूप देण्याचं कार्य या महान चित्रकाराने आपल्या कुंचल्यातून केलं. नग्नता हा अतिशय हळवा विषय त्याकाळात रवि वर्माने अप्रतिमरित्या हाताळला आहे. हिंदू देवदेवतांची चित्रे काढून विटंबना केली असा खटला उभा राहिल्यानंतर स्वतः रवि वर्मा ती केस कोर्टात लढला आणि जिंकलासुद्धा. कोर्टामधले दावे प्रतिदावे वाचताना रवि वर्मा हा कलाकार म्हणून किती थोर आहे हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. चित्रकलेचे बारकावे आणि कलाकाराचे मन रेखाटताना लेखकाने कमाल केली आहे. हा विषय आणि हि कादंबरी लिहिण्यासाठी रणजित देसाई यांनी पाच वर्षे अभ्यास केला; म्हणून ते या नायकाला शब्दरूपातून योग्य तो न्याय देऊ शकले. राजा रवि वर्माच्या आयुष्यातले अनेक हळवे प्रसंग, कलाकृतींंचा प्रवास, बायकोशी असलेलं नातं, जवळच्या नातलगांचा मृत्यू हे सगळं वाचताना आपणही अंततः हेलावून जातो. भारतीय चित्रशैलीला जगाच्या पटलावर उभं करण्याचं काम रवि वर्माने केलं आहे; त्यात बडोद्याचे महाराज सयाजी गायकवाड यांचा त्यांना मोलाचा हातभार लागला आहे. जटायू वध, हंस व दमयंती, सरस्वती, शकुंतला अशा अनेक कलाकृतींचा संदर्भ या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतो. सयाजी राजांच्या सल्ल्यानुसार चित्रकलेचे प्रदर्शन भरवून रवि वर्माने आपली चित्रे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. शेवटी चित्रे व छापखाना सांभाळता सांभाळता होणाऱ्या धावपळीत शरीराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ह्या कलावंताचा अंत होतो.
जगप्रसिद्ध कीर्तीचा असा हा कलावंत रॉय किणीकर यांच्या सांगण्यावरून रणजित देसाई यांनी शब्दात बांधला आणि वाचकांसमोर जिवंत उभा केला. आपला कलेशी संबंध असो वा नसो तरीही आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे व इतरांनाही ते वाचायला सांगितलं पाहिजे. निदान त्यानिमित्ताने तरी ह्या कलानायकाला आपण त्याच्या चित्रांपेक्षा जास्त उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू.
-© गिरीश अर्जुन खराबे.