पुस्तक | मनसमझावन | लेखक | संग्राम गायकवाड |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २५५ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
आपण रोजच सगळीकडे धर्म, जात.. हिंदू, मुस्लिम... आणि अशाच अनेक गोष्टींवरून विभागलेले समाज बघत आहोत. अशाच नवनवीन वार्ता आपल्याला वर्तमान पत्रातून देखील बघायला मिळतात. आपणही याच साच्यात घट्ट बसलो आहे असं मला कधी कधी वाटतं. आपण थोडासा वेळ देऊन नाण्याची दुसरी बाजू पडताळून कधी पाहिली आहे का? हा प्रश्न आपल्याला आवडतही नाही. हे पुस्तक तुम्हाला तसा विचार करायला भाग पाडेल. साचेबद्ध विचारसरणीच्या पलीकडे जाऊन.. समाजातील अनेक धारणांनवरून जे वाद सुरू आहेत.. जे मतभेद आहेत.. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय हेतू आहे? काय उपयोग आहे?
असे अनेक प्रश्न मनाला या पुस्तकामुळे पडले आहेत. मुळात हे सगळे विषय माणुसकीच्या आधी येतात का? आले तरी किती वेळ? किती काळ? आणि समजा येत असतीलच तर स्वतःवर वेळ आल्यावर तुम्ही कसे वागाल? असे एक ना अनेक विषयांची गाठोडी या पुस्तकाने माझ्या समोर खुली करून ठेवली आहेत. त्यातले प्रश्नाचे अचूक उत्तर मात्र आपले आपल्यालाच शोधायचे आहे. आणि हीच शोधमोहीम पुस्तकाच्या पानासोबत पुढे जाते आणि वाचनाची मजा द्विगुणित होते.
कादंबरीचे नाव, "मनसमझावन", आणि मुखपृष्ठ-मलपृष्ठ, दोन्ही विचारपूर्वक तयार केलेले आहेत. अतिशय समर्पक आहेत. पुस्तकाच्या नावाच्या मागची खरी गोष्ट मात्र आपल्याला पुस्तक वाचल्यावर उलघडते. अनेक छोट-छोट्या पात्रांच्या विचारातून ही कथा पुढे जाते. प्रत्येक वेळी एक नवीन विचार मनाला भिडतो. कथा शहरातून गावात कधी वळते हे देखील आपल्या लक्ष्यात येत नाही. कथेतली प्रत्येक व्यक्ती आपल्याला पोटतिडकीने आपली बाजू मांडताना दिसते.. आपण तेवढे न्यायाधीश होऊन पाहत राहतो. पुस्तकाची भाषा अगदी सहज आहे. शहरात ती शहरी वाटते.. गावाकडे गावातली लहेजा असणारी.. त्यामुळे पुस्तक अजूनच संपन्न वाटते.
चिन्मय, रबिया, इरा हे काही मुख्य पात्र तर आहेतच पण त्याच सोबत या रहस्यमयी पुस्तकाच्या काही भागात मंजिरी, केशव, समीर व मैथिली हेही आहेत, आणि ही कथा ज्या मध्यवर्ती गोष्टीवर अवलंबून आहे ते म्हणजे, गावातला म्हसोबा, लालबागचा दर्गा.. आणि "मनसमझावन" ची पोथी. गुंतागुंतीच्या समाज विचारतून एका सहिष्णू भारतीयतेचा आणि माणुसकीचा शोध हाच या कादंबरीचा गाभा आहे. असे पुस्तक वाचून मनात तरंग उमटले जातात, कथा संपल्यावर मनात अनेक प्रश्न उमटतात आणि ते अंतर्मुख होऊन आपल्यालाच शांत करावे लागतात.. आजच्या सामजिक परिस्थितीवर एक सखोल विचारप्रवर्तक कथा वाचून आपलं मन शांत होणं अवघड आहे. या कादंबरीतून उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मात्र आपल्यालाच शोधावं लागतं, आणि हेच या पुस्तकाचं खरे सौंदर्य आहे.
सध्याच्या सामजिक परिस्थितीवर सखोल विश्लेषणपर भाष्य करणारी, एक सुदंर व उच्च प्रतीची कथा या पुस्तकातून लेखकाने वाचकांसमोर मांडली आहे. कथेचा प्रत्येक पैलू बारकाईने तपासलेला असल्याने.. जाती-धर्मावरचे केलेले भाष्य कथेत कुठेच उग्र भासत नाही.. मनाला बोचत नाही. त्याचा कोणाला त्रास होत नाही. "रोहन प्रकाशन" ची ही अभूतपूर्व कादंबरी सर्वांनीच नक्की वाचायला हवी. तुम्ही देखील लवकरात लवकर हे पुस्तक वाचून, आम्हाला या त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.