पुस्तक | जळलेला मोहर | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १७२ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
"जळलेला मोहर" असं विचित्र नाव देण्याइतकं काय असेल ह्या कादंबरी मध्ये म्हणून कुतूहलापोटी वाचायला घेतली. तसंही खांडेकर वाचताना माणूस कधी भावनेच्या एका तरंगावर सतत तरंगू शकत नाही, ती एक लाटच असते ज्यावर तुम्हाला हिंदकळत पुढे जावं लागतं. ह्या कादंबरी मध्येही ते तुम्हाला अनुभवायला मिळेल एवढं मात्र नक्की. स्त्री पुरुषांच्या नात्याबद्दल भाष्य करणारं हे कथानक अनेक पात्रांच्या माध्यमातून पुढे पुढे सरकत राहतं. संसारी जीवनात महत्त्व द्यावे असे अनेक पैलू या निमित्ताने आपल्याला भेटत राहतात
शरीरसुख हे नाव ऐकताच अनेक कान टवकारले जातात, भुवया उंचावल्या जातात मात्र त्याबद्दल जास्त कधी बोललं जात नाही. तरुण तरुणींनी एकमेकांचे हात हातात घेतले पाहिजेत. प्रेमजीवनात शरीरसुखाचा भाग अतिशय महत्वाचा मानला पाहिजे, तरी केवळ कामतृप्ती हे संसाराचे ध्येय कधीच होऊ शकत नाही. हा मोलाचा संदेश आपल्याला खांडेकर या कादंबरीतून देतात. विविध पात्रांच्या संसाराची कथा फुलवत असताना प्रत्येक संसारातली कामवासना व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या लेखकाने वाचकांसाठी खुल्या केल्या आहेत. स्त्री पुरुष संबंध हे जर फक्त नर-मादी या धाग्यात अडकून पडले तर त्यात कोणीच सुखी होत नाही, उलट होते ती संसाराची वाताहतच!
आताही आपल्याकडे असे किती संसार आहेत ज्यात सतत शारिरीक सुखाची अपेक्षा ठेवली जाते. कधी ती पूर्ण होते, कधी ती होत नाही पण म्हणून त्यासाठी संसार जाळणं कितपत योग्य आहे?
अशी अनेक पात्र या कथेतून आपल्याला भेटतात जी बाह्य समाजामध्ये उच्चभ्रू म्हणून वावरतात पण घरात ती कामराक्षसाने पछाडलेली असतात. अशा या राक्षसांमुळे कित्येक संसार फुलण्याआधीच जळून खाक होतात. यात स्त्री आहे, पुरुष आहे कोणीही याला अपवाद नाही. संसाराच्या वेलीवर एका रात्रीत फुल कधीही फुलू शकत नाही, ती फोफावण्यासाठी पोषक वातावरण होणं गरजेचं आहे. एकदा ती फोफावली की तिचा बहर कोणीही रोखू शकत नाही. ह्याच विचाराचे वर्णन खास आपल्या शैलीत करताना खांडेकर म्हणतात,
"आकाशातल्या चंद्राला हात लावण्याच्या धडपडीत माणसाचे पृथ्वीवरचे पाय सुटले, तर तो तोंडघशी पडतो. तो चंद्र योग्यवेळी अनेकांच्या हाती लागतो; नाही असे नाही; पण त्याचा लाभ संसाराच्या सुरवातीला होत नाही. दहा वीस वर्षे संकटे आणि सुखे यांची चव जोडीने घेतल्यावरच त्या चांदण्याची वृष्टी होऊ लागते."
भारदस्त भाषा व आपल्या शब्दांच्या सौंदर्याने, सामर्थ्याने नटलेली खांडेकरांची ही आणखी एक कलाकृती आपल्याला कुठेही नाराज करत नाही. त्यांच्या लिखाणाकडून असलेल्या आपल्या अपेक्षा यातही पूर्ण झाल्या आहेत. स्त्री पुरुषांच्या नात्यावर लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे; हे तर सर्वश्रुतच आहे, त्यावर अजून काय बोलणार. तुम्हीही हा नवीन अनुभव घेण्यासाठी ही कादंबरी वाचू शकता, त्यातून नक्कीच नवीन काहीतरी बोध होईल एवढं मात्र नक्की.
-© गिरीश अर्जुन खराबे.