पुस्तक | दास डोंगरी राहतो | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २९८ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
नारायण सूर्याजी ठोसर हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल किंवा नसेलही पण संत रामदास हे नाव आपल्या शंभर टक्के परिचयाचं असणार. "शुभमंगल सावधान" असं लग्नाच्या मांडवात ऐकताच धूम ठोकणारा मुलगा पुढे जाऊन संत रामदास होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि त्यातूनच पुढे जाऊन "दासबोध" सारखा ग्रंथ आपल्याला उपलब्ध झाला. "दास डोंगरी राहतो" ह्या अतिशय समर्पक शीर्षकातून गोनीदांनी आपल्यासाठी रामदासांच्या आयुष्याच भांडार खुलं केलं आहे. डोंगर, दऱ्या, घळयांमधून आयुष्य जगणाऱ्या व त्यातूनच समाज प्रभोधन करणाऱ्या एका संन्याशाची हि कहाणी आहे.
अवघ्या कोवळ्या वयात घरातून पळून जाऊन ह्या मुलाने थेट नाशिक गाठलं. तिथे उपाशी राहून, घरोघरी भिक्षा मागून उपजीविका केली. जे जे मिळेल ते ते सगळं वाचून काढलं. वेद, उपनिषदे, स्मृती ह्या सगळ्यांचा अभ्यास केला. असाच कष्टप्रद प्रवास चालू असताना एक दिवस त्याला साक्षात्कार होऊन प्रभुरामाच दर्शन झालं. जीवनाच उदिष्ट मिळालं आणि त्या दिवसापासून नारायणाचा रामदास झाला. दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्या घेऊन लोक महाराजांकडे येऊ लागले, आपल्या परीने महाराज त्यांना समाधान सांगू लागले. यामुळे रघुवीर स्मरण करण्यात, एकांतवासात चिंतन करण्यात त्यांना व्यत्यय येऊ लागला आणि एक दिवशी भल्या पहाटे त्यांनी उत्तरेचा मार्ग आपलासा केला. रघुवीर जप करत करत महाराजांनी थेट हिमालयापर्यंत प्रवास केला. संपूर्ण उत्तर भारत पायी फिरून समजून घेतला, तिथे होणारे अत्याचार जवळून पहिले. अत्याचारी सल्तनतीला भेकडांसारखे भिऊन पळणाऱ्या समाजाला त्यांनी लढण्याचे बळ दिले. आणि इथूनच रामदासांनी शिवरायांच्या कार्याला आपल्या हातांनी बळ द्यायला सुरवात केली. पुन्हा पश्चिम महाराष्र्टात येऊन त्यांनी तरुणांना तंदुरुस्तीचे महत्व पटवून देत स्वराज्य कार्यास जोडले.
संन्यास धर्म स्वीकारूनही देव, देश आणि धर्म यांची सेवा रामदासांनी केली. गावोगावी श्रमदानाने मारुतीची मंदिरे उभी करत आपल्या विचारधारेतून पारतंत्र्यात अडकलेल्या जनतेमध्ये त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. "मराठा तितुका मेळवावा, ,महाराष्ट्र धर्म वाढवावा" असा संदेश त्यांनी तमाम मराठी लोकांना दिला. अशा या महानायकाचे संपूर्ण जीवन चरित्र लेखकाने या पुस्तकातून रचले आहे. आयुष्यभर देशाच्या संसाराची चिंता वाहणारा हा महानायक आपल्याला ह्या रसमय कादंबरीमधून भेटत राहतो, जगण्याची ऊर्जा चेतवत राहतो. कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना आपण या देशासाठी योगदान दिलं पाहिजे, त्यातून आपला धर्म जोपासला पाहिजे, हि महान शिकवण आपल्याला या लीळाचरित्रातुन मिळाल्याशिवाय राहत नाही.
आप्पा दांडेकरांनी कादंबरीसाठी निवडलेला हा नायक सर्वार्थाने वंदनीय आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी तो नेहमी राहील आणि राहावा म्हणून त्यांनीही त्याचे चरित्र रेखाटण्याचं ठरवलं असेल, असं मला वाटतं. वाचक म्हणून आपल्यासाठी हि एक मोठी पर्वणीच आहे, तरी त्याचा आपण मनापासून आस्वाद घेतला पाहिजे म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप.