पुस्तक | छावा | लेखक | शिवाजी सावंत |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ८८६ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
मराठी मातीचा अभिमान, स्वराज्यप्रणेते, राजाधिराज, क्षत्रियकुलावंतस छत्रपती श्री शिवाजी महाराज हे नाव उच्चारताना प्रत्येकाची छाती चार वित फुगल्याशिवाय राहते काय? तरीही अशा या मराठी सिंहाच्या पोटी जन्माला आलेला छावा माञ इतिहासाने, मराठी मनाने म्हणावा तेवढा कधी गोंजरला नाही. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला कायम सोस आला आहे असा हा सिंहाचा छावा हरएक आघाडीवर आयुष्यभर झुंजत राहिला. लहानपणीच हरवलेलं मायेचं छत्र, ऐन तारुण्यात नको नको ते नावावर लागलेले आरोप यांनी हा युवराज तुमच्या आमच्यासारखा घायाळ जरूर झाला पण त्यापुढे त्याने कधी हार मानली नाही. अशा एका रणधुरांधराची ही ऐतिहासिक गाथा आहे. शिवाजी सावंतांनी आपल्या बहारदार लेखणीतून ती कागदावर उतरवली आहे. खरंतर राजा संभाजी सारखा नायक कोणीच कथेतून वा कादंबरीतून बांधू शकत नाही. न भूतो न भविष्यती! सारखी ही माणसं जमिनीवर वीज कोसळावी तसा जन्म घेतात आणि आपल्या देदीप्यमान जिवनकार्यातून सभोवताली लख्ख प्रकाश पाडून लोपही पावतात.
अवघ्या बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा पराक्रमी राजा आपल्या पित्याप्रमाणेच कर्तबगार होता. पण इतिहास नेहमीच त्याच्या कर्तुत्वाला न्याय देताना कमी पडला आहे. एकाच वेळी पाच पाच आघाड्यांवर लढाई करणारा एकमेव लढवय्या सेनानी म्हणून ज्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागली असा हा राजा संभाजी. थोरल्या महाराजांनंतर स्वार्थाने अंध झालेल्या स्वजनांबरोबर लढताना मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्याची लढाई असो वा चहूबाजूंनी साम्राज्य गिळंकृत करू पाहणारा शत्रू असो, यातल्या कोणाचाही शंभुराज्यांनी टिकाव लागू दिला नाही. आपल्या असिमित पराक्रमाने त्यांनी मराठी साम्राज्य उत्तरोत्तर वाढवतच नेलं आहे. तरीही व्यसनी, लंपट, संतापी अशा कितीतरी डागण्या इतिहासाने या नायकाला दिल्या. पण ह्या सगळ्यातून पार होऊन स्वराज्यरक्षक म्हणून तो उदयाला आला आणि मराठी मनावर आपलं गारूड बसवून गेला.
संभाजी महाराजांच्या जिवनकाळातील अनेक प्रसंग, ऐतिहासिक घडामोडी, राजकारण, समाजकारण यांची हुबेहूब सांगड छावा या कादंबरीच्या निमित्ताने घातली गेली आहे. तत्कालीन भाषेचा लहेजा, वस्तूची वस्त्रांची ठेवण लेखकाने अप्रतिमरित्या साकारली आहे. कवी कलश व राजा संभाजी ह्या जोडगोळी संदर्भात आजवर रचलेल्या बदनामीच्या कुभांडाला कुठेतरी सक्षम चपराक या कादंबरीच्या निमित्ताने बसली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिजाऊंच्याच तालमीत तयार झालेला हा दुसरा छत्रपती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी, धर्मासाठी लढत राहिला. कपटी औरंगजेबाच्या अतोनात हालअपेष्टांना जराही भिक न घालता महिनाभर झुंज देणाऱ्या धर्मविराची ही कहाणी आहे. कोणालाही न लाभलेला मृत्यु ज्याच्या वाट्याला आला त्या योध्याची ही कहाणी आहे. स्वकियांच्या फंदफितुरीने बळी घेतलेला हा छावा जर खरंच व्यसनी असता, रंगेल असता तर तुळापुरला झालेल्या मरणयातनांपुढे शरण आल्याशिवाय राहीला असता काय? हा विचार करायला लावणारी ही कहाणी आहे.
अशा या आपल्या राजाचा इतिहास जगण्यासाठी, जोपासण्यासाठी प्रत्येक मराठी जनांनी ही कादंबरी वाचायला हवी. अनेक चित्रपट, मालिकांमधून आता हा नायक नावारूपाला आला आहे पण कादंबरी इतका न्याय त्यातून त्याला मिळणे केवळ अशक्य! ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना आपण इतिहासात जरी डुंबत असलो तरी त्यातून वर्तमान आणि भविष्य साकारण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. अशी ही शौर्यगाथा वाचल्यावर आपसूकच मनाच्या पटलावर कवी कलशाचे शब्द उमटतात,
"राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंगतव तूप तेज निहारके तख्त त्यजत औरंग!"
-© गिरीश अर्जुन खराबे.
👍👍👍
ReplyDeleteछान कादंबरी आहे, अवश्य वाचा.
ReplyDelete