पुस्तक | श्यामची आई | लेखक | साने गुरुजी |
---|---|---|---|
प्रकाशन | पुणे विद्यार्थी गृह | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २५६ | मूल्यांकन | ५ | ५ |
अशाच एका आई-मुलाच्या निर्मळ नात्याचं, हे पुस्तक एक सुंदर उदाहरण आहे. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठातून नक्कीच बोध मिळतो, आणि तो बोध कसा द्यावा याचीही शिकवण या पुस्तकात अगदी उत्तम मांडली आहे. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथत्मक चित्र आहे. हे पुस्तक पवित्र आहे.. जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे. 'आचार्य अत्रे' म्हणातात तसे हे पुस्तक म्हणजे महामंगल स्तोत्र आहे. याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहलेल्या या सर्वच कथारूप रात्री तुम्हाला गहिवरून आणतील.
यातील प्रत्येक रात्र नवीन बोध कसा देते, यात एक गम्मत आहे. स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यामधे सर्वांनाच याचा उपयोग होईल. मुकी फुले देवास ही आवडत नाहीत. पायास घाण लागू नये म्हणून जसा जपलास, तसे मनास घाण लागू नये म्हणून जप सांगणारी आई लुगडे अंथरते तेंव्हा डोळ्यांत साठलेलं पाणी ओसंडून वाहते. पत्रावळ, भूतदया, अशा अनेक कथांनी हे पुस्तक वेलीवरच्या फुलांप्रमाणे फुलले आहे. श्यामला पोहता यावे यासाठीचा आईचा आटापिटा, स्वाभिमान, मिंधेपणा यांची आपल्याला जवळून ओळख करून देतो.
बंधुप्रेमाची शिकवण चिंधीच्या गाण्यातून वाचताना अंगावर शहारे येतात. तर उदार पितृहृदय वाचताना प्रत्येक बापाने केलेल्या कष्टाचे चीज होते असे मी म्हणेन.
"घनदाट या रानात, धो धो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी.. देव राहो"
"माझा ग श्याम बाळ, मला तो हवा, देवाजीने द्यावा.. जन्मोजन्मी"
यातील करुणा भाव मनाला सतत जाणीव देत राहतो. तर सांब शिवा पाऊस दे... बोलणाऱ्या इवल्याश्या ओठातून स्वतः कोणत्याही गोष्टीसाठी कसे झटावे, कसे आपल्या परीने मदत करावी हेच दिसून येते. या पुस्तकातील सगळंच अगदी साफ, निरागस, निर्मळ मनाने वाचावं अस आहे. सुखदुःखाच्या पलिकडे जाऊन, मातीशी एकरूप झालेल्या अनेक कथांची ही एक माळ आहे. जी तुम्हाला समृद्ध करेल.
-© अक्षय सतीश गुधाटे.