शितू - गो. नी. दाण्डेकर | Shitu - Go. Ni. Dandekar | Marathi Book Review

शितू-गो-नी-दांडेकर-Shitu-Go-Ni-Dandekar-Marathi-Book-Reviews
पुस्तक शितू लेखक गो. नी. दाण्डेकर
प्रकाशन मृण्मयी प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १३८ मूल्यांकन ४.८ | ५

बाल वयातील प्रेम म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते... कोणालाही सांगता येत नाही, आपल्यालाही समजत नाही परिणामी आपण थोडेसे भावनांमध्ये अडकतो. थोडंसं वाईट वाटतं थोडंसं रडायला येतं आपलं आपल्यालाच हसूही येतं. ते प्रेम निरागस तर असतेच तितकच बालसुलभ ही असत. अस प्रेम आपल्या लेखणीतून मांडणं, त्या विचारांची धुंदी चढावी असं काहीतरी लिहावं, असा चमत्कार गो. नी. दांडेकर यांनी शितू लिहून संपुर्ण महाराष्ट्राला परिचित करून दिला आहे.

लहानपणी मला शाळेत शितू हा धडा होता. त्यावरूनच या पुस्तकाची वाचण्याची धडपड सुरू झाली. आणि त्या धडपडीला साजेस असच हे पुस्तक आहे अस मी म्हणेल. कोकणातील अद्वितीय साैंदर्य, नारळी पोफळीच्या बागा... छोटंसं गांव व त्यातील लाल वाळूच्या मातीत जन्मलेली अनेक लोक या पुस्तकाला अजूनच सुंदर बनवतात. अंत थोडासा भावनावश करणारा आणि दुःखद नक्कीच आहे पण तिथपर्यंत चा प्रवास मात्र अप्रतिम सौंदर्य आणि आनंद देऊन जाणारा नक्कीच आहे.

शितू म्हणजे एक कोकणकन्या आहे आणि ती गो. नी. दांडेकर यांनी आपली मानसकन्या म्हणून तिच्यावर संस्कार केल्याचं सांगितलं आहे. कोकणातील भाषेचा, तो लहेजा आणि आपसूकच लाभलेलं ते निसर्गाचे वरदान हे पुस्तक वाचत असताना जरूर होईल. लहानपणी दोनदा विधवा झालेली शितू, आणि गावभर उनडक्या करणारा विसू यांच्यातील अबोल नाते, कधीही व्यक्त न होऊ शकलेले दुर्दैवी प्रेम यातच संपूर्ण कथा गुंफली आहे. विसूच्या वडिलांनी आसरा दिलेली ही कहाणी पोर हळू हळू कशी त्या नात्यात ओवली जाते हे खूपच लोभस आणि सुंदर आहे.

प्रेमकथा ही एक बाब आहेच पण त्याचबरोबर समाजातील घातक रुढी परंपरा त्यासोबतच नकळत ओढवले जाणारे त्यांचे नियम आणि याचा त्या निष्पाप जीवांवर झालेला परिणाम हे एक खूप भयाण वास्तव लक्षात आणून दिले आहे आणि यात लेखकाला यश मिळाले म्हणजे आपलं दुर्दैव असेच म्हणावे लगेल. सुरेख अलंकारिक भाषा त्यात कोकणी लहेजा, विविध प्रकारची माती अन प्रेमाचा तडका, समाजातील दुर्दैवी परंपरा आणि त्यात अडकलेले लोक या साऱ्यांचा संगम गोनिदांच्या शितुला समृद्ध करतो. याहून हळवी आणि मार्मिक प्रेमकथा, सुंदर, सुरेख आणि सुरेल असू शकते यावर आता माझा विश्वास बसणार नाही. तुम्हीही एकदा अनुभव घ्या या पवित्र प्रेमतिर्थाचा... म्हणजेच गोनिदांच्या शितूचा..

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form