पुस्तक | शाळा | लेखक | मिलिंद बोकिल |
---|---|---|---|
प्रकाशन | मौज प्रकाशन गृह | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ३०३ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
मतलबी जगात वावरत असताना, शाळेच्या आठवणीने उर भरून येतो. त्या निर्व्याज प्रेमाने मन गहिवरून येते. रोजच्याच व्यापातून थोडा वेगळा विचार, शाळेच्या आठवणी, जुन्या बालमित्रांची संगत काही विस्कटलेले क्षण पुन्हा नीट करून जाते. मला प्रतिकूल काळात आनंद देणाऱ्या त्या क्षणांच मला भलतच अप्रूप वाटतं, आणि या काही क्षणात शाळेचं स्थान नक्कीच अग्रणी आहे.
आपण सर्वच शाळेशी काही ना काही आठवणीने जोडलें गेलेलो असतो. अगदी कधीच शाळेत न गेलेल्या माझ्या काही मित्रांच्या सुद्धा शाळेशी निगडित अगणित किस्से आणि आपसूकच आठवणी आहेत. वेताची छडी, रंगीत खडू, नायलॉनच दप्तर, तुटके बाक अश्या अनेक गोष्टींना शाळा हे एक नाव उजाळा देऊन जातं. यातच लहानग्या बालमित्रांची जोडी म्हणजे गोष्ट काही औरच आहे. आणि त्यात दुग्धशर्करा म्हणजे विटी दांडू, सुर पारंब्या आणि असे बरेच खेळ.
पुस्तक वाचत असताना अशा विविध आठवणीं तुम्हाला व्याकूळ करीत राहतील, अनेक किस्से डोळ्यांसमोर जसे च्या तसे उभे राहतील हीच लेखकाच्या लेखणीची किमया आहे. प्रसंगवर्णन विलोभनीय आहे. लहानशा गावात बालसुलभ मुलांना नकळत झालेल्या प्रेमाचं हे पुस्तक आहे. एका इवल्याशा जगात गोजिरवाण्या सुंदर मुलीच्या येण्यामुळे नकळत झालेल्या बदलाचे, आनंदाचे आणि घटनांचे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. आई, बाबा, मामा, सुऱ्या, बगळ्या, आंबेकर सगळीच पात्र लेखकाने दर्जेदार लिहली आहेत आणि ओळख करून दिली आहे. यात प्रेम आहे, लोभ आहे, रुसणं आहे, पाठलाग आहे, लपून बघणं आहे, रडणं आहे आणि बोधही आहे. आणीबाणीचा काळ, घरावर घटांनाचा झालेला परिणाम आणि दोघांच्या प्रेमाची गोष्ट लेखकाने लीलया गुंफली आहे.
"Fame is the fragrance of heroic deeds."
मामाचं हे वाक्य आजूनही माझ्या मनात रुतलेलं आहे. पुस्तकात प्रत्येक पात्र वेगळं आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत. पडद्यामागील पात्रांना आणि घटनानांही लेखकाने सुरेख रंग, सुरेख कल दिला आहे. पुस्तक वाचत असताना सुंदर गोष्ट, दर्जेदार पात्र आणि घटनांची उजळणी साऱ्याचाच मेळ तुम्हाला खुश करून जाईलच याची खात्री आहे. आयुष्याच्या डोळ्याला लेखकाने लावलेले काजळ डोळ्यात पाणी देखील आणेलही, पण चित्र नक्कीच स्वच्छ दिसेल यात शंका नाही. पुन्हा तरूण होण्यासाठी एकदा ही "शाळा" नक्की वाचा. याच धाटणीचं "मिलिंद बोकील" यांनी लिहिलेलं "गवत्या" हे पुस्तक पण तुम्हाला अतिशय मोहून टाकेल यात मला शंका नाही.
पुस्तकाच्या शेवटी लेखकाच्या लेखणीला जो एक मार्मिक, हळवा साज आलेला आहे तो भाग अवर्णनीय आहे. तो मी तसाच्या तसाच लिहावा अस वाटतं.
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसरखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे."
-© अक्षय सतीश गुधाटे.