पुस्तक | नदीष्ट | लेखक | मनोज बोरगावकर |
---|---|---|---|
प्रकाशन | ग्रंथाली प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १६८ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
नदीष्ट! हे कसं नावं आहे? लेखकाला 'नादीष्ट' तर म्हणायचं नव्हतं ना! हा माझा पहिला विचार. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिल्यावर वाटतं ते "नदीष्टच" आहे. आणि किती समर्पक आहे याची जाण पुस्तक वाचल्यावर होते. जितकं सुंदर नाव, जितकं वेगळं नाव.. त्याहून कैक पटीने वेगळी ही कादंबरी आहे. सर्व प्रकारच्या चौकटी मोडून लिहीलेली ही कादंबरी माझ्या मनात अगदीच खोल जागा करून गेली आहे. मनोज बोरगांवकर यांनी मांडलेल्या नदीच्या पात्रात जगाचे दुःख सामावले आहे. मानवी मूळ आणि कूळ एकाच वेळी उलघडू पाहणारी ही कादंबरी मराठी साहित्यात अमुलाग्र बदल करणारी आहे, तसेच एक अत्यंत महत्वाचा घटक आहे असे मला वाटते.
आपल्या अतिशय कसदार अनुभवातून ही कादंबरी लेखकाने पुढे नेली आहे. त्यांची कथा मांडण्याची पद्धत.. त्यावरील एक सूक्ष्म व अलवार दुःखाची झालर.. एका एका भागातून उलगडताना पुस्तक अधिकच तीव्र होत जाते. नदी आणि तिच्या पात्राच्या आसपासचं जीवन जरी लेखकाने मांडलं असलं.. तरीही ते इतके वाढत जाते की नदीचं पात्र उगमला आणि अंताला इतकं वेगळं असेल, अगदी तसच या पुस्तकाचं काहीसं वाटतं.
पुस्तकाचा विषय सर्वसमाविक आहे. स्टेशन वर बसणारी "सकिनाबी", मासे पकडणारा "बामणवाढ", मंदिराचा "पुजारी", नदीकाठी आपल्या म्हशी चारणारा "कालू भैय्या" व त्याची प्रेयसी. अंघोळीला येणारा एक अबोल व खानदानी भिकारी. साप शोधत आलेला सर्पमित्र "प्रसाद" आणि आपलं दुःख गोदामाईला सांगणारी एक तृतीयपंथी "सगुणा". लेखकाला ज्याने नदी पार कशी करावी ते शिकवले ते "रावसाहेब". आणि याच सर्वांना एका धाग्यात बांधणारा लेखक. इतका मोठा विस्तार असणारी ही छोटी पण भयंकर सुंदर कादंबरी. मला ही कादंबरी वाचताना कोसला ची आठवण झाली.
मनाला डंख करणाऱ्या सापाप्रमाणे ही कादंबरी दुःखाचा डंख करते.. ते दुःख हळू हळु तुमच्या शरीरात भिनत जाते, तशीच तुम्हाला या या पुस्तकाची गुंगी येते. आणि आपले डोळे उघडले की आपल्याला नवीन आयुष्याच्या नवीन प्रवासाच्या अनुभूतीने सगळं कृतज्ञ वाटावं अस आपल्याला जगाकडे पहाताना वाटेल ही माझी खात्री आहे. नदीष्ट व नादीष्ट माणसांसाठी एक विलक्षण अनुभवसंपन्न कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर यांची नदीष्ट. हे पुस्तक एकदा नक्की वाचा.. अनुभवा.. समजा.. शिका.. आणि समृद्ध व्हा. हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा!