मृत्युंजय - शिवाजी सावंत | Mrutyunjay - Shivaji Sawant | Marathi Book Review

मृत्युंजय-शिवाजी-सावंत-Mrutyunjay-Shivaji Sawant-Marathi-Book-Reviews
पुस्तक मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाउस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ७४४ मूल्यांकन .  / ५

जगातील सर्वात मोठं महाकाव्य म्हणजे महाभारत. महाभारतातील व्यक्तिरेखा मोजता मोजता भोवळ येते म्हणतात ते काही खोटे नाही. महाभारत म्हणजे प्रेम, लोभ, राजकारण, सत्ता, हिंसा, व्याभिचार, करुणा, दुःख, हट्ट असे जितके सारे वेगवेगळे मनुष्यभाव असतील त्यांची सुरेख सांगड घातली आहे. या साऱ्या व्यक्तिरेखांच्या गोतावळ्यात उठून दिसते ती व्यक्ती म्हणजे कुंतिपुत्र, अंगराज, राधेय, सुर्यपुत्र कर्ण. कर्णाची कहाणी ऐकताना मला नेहमी तळ्यातील त्या बदकांत हा राजहंस आयुष्यभर कसा राहू शकला हीच बाब बोचत राहते. वाटेवर चालताना लागलेली ठेच जितकं दुःख देते, त्याहून अधिक दुःख तो दगड आपल्या आप्तस्वकीयांकडून ठेवला होता याचे होते. ही जाणीव कर्णाचे जीवन सतत करून देते.
 
शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय कादंबरीने कर्ण या नावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. तलम वस्त्रला लावलेल्या ठिगळाची उपमा जेंव्हा कर्णास लेखक देतो तेंव्हा काळीज ओलावते. शिवाजी सावंत यांचा हातखंडा असलेल्या प्रसंग वर्णनाची अनुभूती तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. कोणीतरी म्हले आहे.
"If you are a reader you can live thousands of life"
आणि त्याच प्रमाणे आपणही हळू हळू कर्ण होऊन जगत आहोत असच वाटायला लागतं. रोज सकाळी उठून कोवळ्या उन्हात पाठ खरपूस होईपर्यंत बसावे वाटते, ही लेखकाची किमयाच म्हणावी लागेल. आपणास माहीत नसलेल्या अनेक नातेसंबंधांना ही कादंबरी नक्कीच उलगडा देईल असे मला वाटते.
 
या पुस्तकात तो जुना काळ आणि त्याच वर्णन एका विशिष्ट आणि नवीन प्रकारे केलं आहे. ही गोष्ट आपल्याला एक त्यातलीच एक व्यक्ती सांगत असते म्हणून ती अजूनच आपलीशी वाटते. कधी कृष्ण, तर कधी कुंती यांच्या मुखातून महाभारतातील अनेक घटनांना उलघडत असताना प्रवाहातून येणाऱ्या एका विशिष्ट कर्णाच्या व्यक्तिरेखेचा, फारच दिव्य आणि लोभस असा अनुभव येतो. लहानपणापासूनच शुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे अनेक चांगले गुण अगदी निखळ मांडले जातात. सतत दुर्लक्षित असल्याने जगाला आपलं नाणं कसं खणखणीत आहे हे दाखवण्यासाठी घेतलेली जीवापाड मेहनत तुम्हालाही एक नवीन ऊर्जा देते. ताकत, सत्ता आणि बुद्धी असूनही एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम असू शकतो याचं उदाहरण म्हणजे राधेयाचं जीवन. आई, तात, भाऊ, दुर्योधन, कृष्ण सगळ्यांवर जीव असणारा हा कर्ण आणि त्याची कहाणी हृदयद्रावक आहे.
 
शिवाजी सावंत यांनी अगदी सुरेख लिहलेल्या या कादंबरीचे अनेक चाहते आहेत. अनेकांना पुस्तकांची आवड निर्माण करण्यात या कादंबरीचा मोठा हात आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड असणाऱ्या या कादंबरीचे वाचन आपण नक्की करावे असे वाटते. फक्त डोळ्यांपुढे दिसणारी गोष्ट खरी नसते, त्याच्या पाठीमागे अनेक योजना अनेक घटना कळत-नकळत आणि जाणून-समजून चालू असतात हे पुस्तकातून वाचताना एक नवा रोमांच मनात तयार होतो. तसेच.. पुढे काय? ची हुरहूर तुम्हाला पुस्तक खाली ठेऊ देत नाही. दानवीर कर्णाची ही कहाणी आयुष्यातील अनेक रिकाम्या जागा भरून काढेल यात शंकाच नाही. निवलेले मन प्रसन्न होऊन डोलू लागते. अनेकांच्या विचारांना कलाटणी देणारी कादंबरी म्हणावी लागेल. तुम्ही आवर्जून वाचाल अशी आशा आहे.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form