कुतूहलापोटी - अनिल अवचट | Kutuhalapoti - Anil Avchat | Marathi Book Review

कुतूहलापोटी-अनिल-अवचट-Kutuhalapoti-Anil-Avchat-Marathi-Book-Reviews
पुस्तक कुतूहलापोटी लेखक अनिल अवचट
प्रकाशन समकालीन प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १९५ मूल्यांकन . | ५

माणसाच्या मनात अनेक गोष्टींचं कुतूहल हे मूलतः असतचं. आश्चर्य, नवल किंवा कुतूहल यानेच तर नवनवीन प्रश्न निर्माण होतात. बालवयात मनाला छळणारे हे प्रश्न, न उलगडल्याने हळू हळू ते मनातचं राहून जातात. आपण ते तसेच आहे असं समजून पुढे जातो. अनेक लहान मुलांना आपण किती प्रश्न विचारशील? असं खडासावतोही. पण खरं तर या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं.. त्यांचं नक्की गुपित काय? ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढायला हवी. त्याने पुन्हा एकदा सर्व गोष्टी सुरळीत होतील असं मला वाटत आहे. कमीत कमी प्रत्येक गोष्टीला एक नवीन पैलू एक नवी बाजू आहे हे तरी आपल्या लक्षात येईल.

लेखक डॉ. अनिल अवचट यांचे सामाजिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या समोरच्या सजीव-निर्जीव गोष्टींचं रहस्य जाणून घ्यायचा एक सुंदर प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना पडलेल्या प्रश्नाची उकल करण्यासाठीची धडपड आहे. नवीन त्या त्या विषयातील तज्ज्ञ गुरू शोधून ती गोष्ट स्वतः समजून घेण्याचा हट्ट आहे व तीच गोष्ट अगदी सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा पद्धतीने लिहिण्याची त्यांना कलाही अवगत आहे. याच गोष्टीमुळे हे पुस्तक अतिशय सुंदर झालं आहे. अगदी सोपी आणि साधी भाषाशैली.. त्या त्या विषयाचं मूलभूत ज्ञान व त्याचसोबत वाचकाची नाडी पकडुन तिच्या अनुषंगाने केलेले वर्णन, कोणालाही या पुस्तकाच्या मोहातच पाडते.

मुखपृष्ठ पाहिल्यावर कोणालाही हे पुस्तक विकत घ्यावे वाटेलच आणि पुस्तक वाचल्यावर ते किती चपखल आहे हेही नक्की जाणवेल. या पुस्तकात लेखकाने अतिशय निराळे विषय हाताळले आहेत. त्यांची निवडही अगदी चपखल आहे. फंगस, बॅक्टेरिया, साप, मधमाशा, पक्षी, मानवाचं शरीर, रक्त, कॅन्सर, आणि प्रकृतीतील एक विशेष म्हणजे जन्मरहस्य असे अनेक विषय अगदी शिताफीने हाताळले आहेत. मध कसा तयार होतोआपलं शरीर कसं काम करतं? पक्षी कसे उडू शकतातअसे अगदी साधे आणि मूलभूत वाटणारे प्रश्न जे आपण इतके दिवस दुर्लक्षित करत होती त्यांची उत्तरे लेखकाने या पुस्तकातून दिली आहेत.

मला वाटते हे पुस्तक प्रत्येक पालकाने आपल्या लहान मुलाला द्यावे. त्यांच्याकडुन वाचून घ्यावे, आणि आपण स्वतःही वाचावे. सर्व वयोगटाच्या वाचकांसाठी असणारं हे पुस्तक सगळ्यांच्याच ठेवणीत असावं असं मला वाटतं. तुम्ही देखील हे पुस्तक आत्ताच विकत घ्या आणि वाचून नक्की कळवा, तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form