पुस्तक | केशराचा पाऊस | लेखक | मारूती चितमपल्ली |
---|---|---|---|
प्रकाशन | साहित्य प्रसार केंद्र | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २०२ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
"केशराचा पाऊस" या नावातच इतकं माधुर्य आहे की कोणताही निसर्गप्रेमी किंवा कोणताही वाचक याकडे सहजच आकर्षिला जाईल. या पुस्तकाने कितीतरी दिवस माझ्या मनात घर करुन ठेवलं होत. कधी पुस्तक वाचेल अस झालं होत. मारूती चितमपल्ली यांची पुस्तकं आपल्याला निसर्गाची घरबसल्या सैर घडवून आणतात हे तर आपल्याला माहितच आहे, परंतु त्यांच्या लघु कथा मनाला एक शांतता देतात. आपल्याला अल्हादकारक वाटायला लागतं. कथांमधील निसर्गाच्या, पशुपक्ष्यांच्या, आणि जंगलाच्या वर्णणाने आपण त्या कथांमध्ये पुरते अडकून जातो.
या पुस्तकद्वारे चितमपल्ली यांच्या एका नव्या लेखन शैलीचा मी चाहता झालो आहे. मला पुस्तकाच्या सुरवातीला वाटलं की प्रेम कथा आणि निसर्ग या दोन गोष्टी घेऊन आपण किती प्रकारे नवीन कथा लिहू शकतो अगदी ३-४ प्रकारे फार तर फार. पण पुस्तक वाचताना मात्र प्रत्येक कथेगणीक प्रत्येक पानागणीक माझा विचार चुकीचा ठरत होता. निसर्गाच्या वैविध्याशी आणि चितमपल्ली यांच्या लेखणीतून प्रत्येक कथा ही सुंदर चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभी ठाकत होती.
निसर्गाची किमया.. त्यांच्यातील अनेक अनभिज्ञ माहिती.. अनेक वनस्पती अनेक झाडांचे प्रकार, पशु पक्षी त्यांचे आवाज.. त्यांच्यातील विविधता. अनेक बारकावे माहिती नसणारे प्राण्यांचे अस्तित्व आणि त्याच सोबत अनेक आदिवासी लोक त्यांच्यात प्रचलीत असणाऱ्या काही दंतकथा काही प्रथा या पुस्तकातून माहिती होतात. त्यामुळे हे पुस्तक मला खूपच जास्त मनाला भिडणारं वाटलं.
आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, कोणत्याही स्थितीत हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. प्रवासात वाचायला मला हे पुस्तक खूप आवडेल. तुम्ही पण हे पुस्तक वाचून पहा.. मला तुमचा अभिप्राय कळवा. पण मी आताही खत्रिनिशी सांगू शकतो तुम्हाला हे पुस्तक खूप आवडेल.
-© अक्षय सतीश गुधाटे.