पुस्तक | काजव्यांचं झुंबर | कवी | अक्षय सतीश गुधाटे |
---|---|---|---|
प्रकाशन | ईनसाईड मराठी बुक्स | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ११५ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
अनेक आयामांनी रंगलेल्या आपल्या जीवनाकडे, जीवनातल्या वेगवेगळया प्रसंगांकडे बघण्याची एक वेगळी आणि तल्लख दृष्टी मिळविण्यासाठी हा काव्यसंग्रह एकदा तरी वाचायला हवा. कोणत्याही कवितेपासून सुरू करावं असं हे पुस्तक वाचताना आपण छान क्षितिजावर बसलो आहोत असा भाव मनात दाटल्याशिवाय राहणार नाही. प्रेम, वात्सल्य, करुणा, विरह असे कित्येक भाव यातल्या प्रत्येक कवितेतून वाहत वाहत आपल्याला येऊन भिडतात. "खळी, संबंध, गुन्हा, थट्टा, अनेकदा"... या अशा सगळ्याच कविता उत्तम रंगल्या आहेत. राजकरणावर भाष्य करणारी अन् पिढ्यानपिढ्या माणसांचा फायदा उठवणारी "गाढवं" ही कविता असो किंवा खुद्द देवालाच वेशीवर टांगण्याचे धारिष्ट्य करवणारी "मीच माझा देव वेशीवर टांगलाय" ही कविता असो, आपल्याला सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही.
गेल्या दहा वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो पण एक गोष्ट मी ठामपणे सांगू इच्छितो की यातल्या कित्येक कविता ह्या कवीच्या स्वभावाविरूद्ध असूनही तंतोतत जुळलेल्या आहेत. त्यातून समाजाकडे, आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटनांकडे बघायची कवीची चौकस दृष्टी आपल्यालाही नकळत एक वेगळी नजर बहाल करून जाते. तसेच प्रत्येक कवितेची आपली एक खास बाब आहे, आपला एक वेगळा रंग आहे, अशा एकाचवेळी अनेक अर्थांनी नटलेल्या कित्येक कविता यात आपल्याला नक्की वाचायला मिळतील. प्रेमकविता वाचताना हरवून जायला होतं पण शेवटच्या ओळींमध्ये लपलेल्या अर्थाने वा वेगळ्या वळणाने त्या कवितेचा रंग पालटून जातो.
"जुनेच, कापुराच हसू, भेटी, तू" या प्रेम कविता असूनही त्यात दडलेली वेदना तुम्हाला अनुभवायला मिळेल. असं कित्येकदा होतं ज्याने प्रेमात असणाऱ्यांच्या आयुष्यात वेगवेगळी वळणे येतात, ज्यातून माणूस घडत-बिघडत असतो. अपेक्षाभंग असतात, निराशा असते आणि ज्याची त्याची एक वेदनाही असते पण तरीही आपल्याला ते हवं हवंस वाटतं आणि हेच कवीने "जुनेच" या कवितेतून मांडलेल आहे, जे शेवटच्या ओळी वाचेपर्यंत सहजी लक्षात येत नाही, मला वाटतं हीच अक्षयची खासियत आहे. कुशल चित्रकाराप्रमाणे तो वरच्या ओळींत उत्तम चित्र रंगवतो मात्र शेवटी त्या चित्राला संवेदनशीलतेच आणि परिस्थितीच बोट लावायला तो विसरत नाही. "अनेकदा" सारखी कविता वाचल्यावर कवीच्या संवेदनशील मनाला सलाम करावासा वाटतो. त्यात असलेल्या गूढ यातना ह्या त्याला जाणता आल्या व त्याच सक्षमतेने त्याने आपल्यापर्यंत पोहोचवल्या यासाठी त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
"वेदना, खळी, बाबा, होते आहे".. यांसारख्या अनेक सुंदर रचना अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला विसरू नका. एक मित्र म्हणून मला अभिमान आहे पण एक वाचक म्हणून हा काव्यसंग्रह वाचताना ऊर अधिक भरून येतो. एक वाचक म्हणून सांगतो, यातल्या हर एक कवितेने आपल्या मनाचा गाभारा उजळल्याशिवाय राहणार नाही. घरात शोभेला असतं तसं मनाच्या शोभेसाठी लागणार हे झुंबर विकत घेऊन वाचायला विसरू नका! यातल्या कवितांच्या काजव्यांनी माझ्यासारखे तुमचेही मन, बुध्दी आणि डोळे दिपून जातील यात शंका नसावी!
-© गिरीश अर्जुन खराबे.