पुस्तक | घर हरवलेली माणसं | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २०४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
आत्ताच वपुंचं "घर हरवलेली माणसं" पुस्तक वाचून संपलं, वाटलं पुस्तक संपलं.. माणसं संपायची नाहीत. अस पुस्तक पुन्हा वाचायला मिळेल अस सांगु शकत नाही. वपुंचं वैचारिक आणि सामाजिक या दोन्ही गोष्टींवर भाष्य करणार हे पुस्तक अगदीं पहिल्या गोष्टीपासूनच माझ लाडकं झालं अस म्हणायला हरकत नाही. त्याला लाभलेली त्यांचीच प्रस्तावना अगदीच विशेष आहे, तशी त्याला प्रस्तावना म्हणता येणार नाही.. त्यांचं मनोगत म्हणू हवं तर.. पुस्तकाबद्दलचं.
या पुस्तकांत घरात असलेले दुरावे, एकच घरात राहून अनेक प्रकारे दूर आणि वेगवेगळ्या कारणांनी दुरावलेली माणसं, त्यांच्या व्यथा त्यांचे हाल या साऱ्यांची एक सुंदर सांगड घालून या काही कथा लिहिल्या आहेत. वपु म्हटलं की आपल्याला पुस्तक घेताना फार वेळ खर्ची करावा लागत नाही. वाचू की नको? चांगलं असेल का? असले प्रश्न मुळीच सतावत नाहीत. वाचताना फक्त आणि फक्त आपण त्यात अडकून पडतो. अशाच अनेक दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या कथांचं हे वपुंचं चौतिसाव पुस्तक.
घर म्हटलं की अनेक बारीक सारीक गोष्टी आल्या, वेगवेगळे नातेसंबंध आले, वेगवेगळी विचारसरणी आली. आणि यातूनच माणूस माणसाचे घर घडत असते. त्यातले वाद, आनंद आणि इच्छा-अपेक्षा या सगळ्याच माणसाला चिकटतात. अश्याच घरांची ही कहाणी करून वपुंनी मांडली आहे. अनेक कारणांनी मोडलेले संसार यातून दाखवले आहेत. मुलांमुळे, आई बाबांमुळे, नवऱ्यामुळे, बायकोमुळे, शारीरिक आकर्षणाने, कधी जुन्या प्रेमाच्या आठवणीने. प्रत्येक कथेची एक वेगळीच बाजू आहे. यातील बहुतांश कथा या शारीरिक संबंध आणि मराठीत अपरिचित किंवा कमी लिहिल्या जाणाऱ्या प्रकारावर आहेत. घर हरवलेली म्हणजेच घरात राहूनही दुर तर कधी घरालाच पारखी झालेली माणसं पाहिली आणि प्रत्येक कहाणी मधून एक नवीन मी घडलो असच म्हणावं वाटतं.
ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी तर हे पुस्तक वाचावेच असं मी म्हणेल अन् ज्यांनी अजून लग्न अनुभवलं नाही त्यांनीही हे पुस्तक वाचणं गरजेचे आहे कारण आपणही त्याच घराचे एक अविभाज्य भाग असतो आणि आपल्याच सोबत यातील अनेक गोष्टी घडत असतात. आपल्याला त्याची जाण करून देण्यासाठी लेखकाने केलेले हे प्रयत्न खूपच सुंदर स्वरूपात समोर आले आहेत. हे पुस्तक माझ्यासाठी एक पर्वणीच ठरली यात शंकाच नाही, पण तुम्हालाही खूप आवडेल हे मी खात्रीशीर सांगू शकतो. छान उत्कंठा वाढणाऱ्या गोष्टींचं हे पुस्तक मला आवडलं आहेच, तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा!