पुस्तक | द आंत्रप्रन्योर | लेखक | शरद तांदळे |
---|---|---|---|
प्रकाशन | न्यू ईरा पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १८४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
आयुष्यात आपणही काहितरी करावं, आपलंही नाव लोकांनी सन्मानाने घ्यावं, अशीच स्वप्नं सगळेजण उराशी बाळगून असतात. आणि याच गर्तेत अडकून आपण आपलं जगण्याचं ध्येय शोधायलाच विसरतो. या स्वप्नांचा पाठलाग करतना बराच वेळ निंदा, प्रशंसा करण्यात किंवा "कारणे द्या" यातच वाया घालवतो. माझही काही वेगळं नाही. आणि हे सांगण्याचा उद्देश म्हणजे, जीवनाचा हा एक भाग आहे. पण जर तुम्हाला स्वतःसाठी काही करायचं असेल, स्वतःचं विश्व बदलायचं असेल, तर हेच ते पुस्तक आहे.
"द आंत्रप्रन्योर" चे लेखक शरद तांदळे यांचा व्यावसायिक प्रवास या पुस्तकातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मला वाटतं तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील, अनेक प्रवास अनुभवले असतील पण या प्रवासात एक खास शैली आहे, ती म्हणजे "साधेपणाची" आणि स्वतःबद्दलही निर्भिडतेने बोलण्याची. स्वतःच्या प्रवासातून अनेकांना लढण्याचीच हिम्मत देऊ पाहणाऱ्या एका मराठी युगनायकायची. अनेकांनी आयुष्यात "काय करावं?" यावर लिहलं आहे, परंतू "कसं करायला हवं?" आणि "काय करू नये?" हे दोनही निरुत्तर प्रश्न या पुस्तकातून लेखकाने सुंदर पणे हाताळलेले दिसतील. मी पुस्तकाला मुद्दामच प्रवास असा शब्द वापरला... कारण हा प्रवासच आहे, एका सामान्य कुटुंबातून आलेल्या, आपल्यासारख्याच एका तरुणाचा.
हे पुस्तक फक्त उद्योजकांसाठी आहे का? असा प्रश्न मलाही पडला होता. तर उत्तर आहे... "नाही". शून्यातून उभं राहणाऱ्या कोणत्याच माणसाचा प्रवास मर्यादित असूच शकत नाही.
मला पुस्तक वाचताना आपणही तिथेच आहोत असा भास होत होता. पण प्रत्येक पुस्तकात होतो तसा नायक असल्याचा नाही. "तर स्वतःला स्वतःचाच आरसा दाखवतानाचा आभास.". हे पुस्तक सगळ्यांसाठीच आहे. उद्योग, त्यातील बारकावे, नाती आणि त्यातील खाच-खळगे, विचार आणि त्यांची शक्ति यावर लेखकाने मांडलेलं स्वतःच मत तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. आणि फक्त इतकच नाही तर आजवरच्या अनेक आपल्या जुन्या विचारांना जाब विचारायला लावणारं हे पुस्तक आहे. विचारात पाडणारच!! उद्योगाचा वारसा नसून, उद्योजक होऊन नव्या पिढीला एक प्रेरणा देणारं हे पुस्तक. सर्वांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आपण कसं पहायला हवं, हा "नाविन्याचा लोलक" या पुस्तकात आहे. साधी ग्रामीण बोली भाषा, साधेच संदर्भ आणि साधीच पण प्रभावी शिकवण या पुस्तकाने मला दिली. ना कोणताही बडेजाव, ना कसला आव. पण ओळ ना ओळ मेंदूला त्रास देणारी, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट.
स्वतःला आरशात पहायचं आहे? उद्योग समजून घ्यायचाय? माणूस जाणून घ्यायचाय? प्रवास अनुभवायचे आहेत? याची उत्तरं पुस्तकातूनच मिळतील. पुस्तकाने तयार केलेले नवीन प्रश्न तुम्हांला समृद्ध करतील. "नक्की वाचावं असं पुस्तक, आणि एकदाच नाही तर... हजारदा वाचावं अस!"
"आपल्या मरणाने कोणाला फरक नाही पडणार पण जगण्याने मात्र पडू शकतो"
अशा ओळी लिहिण्यामागे असलेली व्यक्ती आणि विचारसरणी तुम्हाला का नाही आवडणार? आवडेलच! मला खात्री आहे... आणि तुम्हालाही पटेलच.
बीड........................ ते .........................लंडन!