एल्गार - सुरेश भट | Elgar - Suresh Bhat | Marathi Book Review

एल्गार-सुरेश-भट-Elgar-Suresh-Bhat-Marahi-Book-Reviews
पुस्तक एल्गार लेखक सुरेश भट
प्रकाशन साहित्य प्रसार केंद्र समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १२८ मूल्यांकन ४. / ५

गझल असा शब्द कानावर जरी पडला तरीही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नावं तरळले असेल. गझल हा काव्यप्रकार मराठी भाषेत रुजू करणारे, तिला एक खास मराठीची शैली बहाल करणारे, मराठी रांगडेपणा, मराठी लहेजा, एकाही ठिकाणी गलीच्छ शब्दांचा वापर नाही, हिन्दी, उर्दू, फारसी गझलेचा बारीक अभ्यास करून मगच मराठी गझलही त्याच दर्जाची किंबहूना त्याहूनही अधिक खुलवून दाखवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके, थोर कवी सुरेश भट.

अनेकांना तोंडपाठ असणारां हा कविता संग्रह आहे. यातले अनेक शेर अनेकांना मी सहजतेने म्हणताना ऐकलं आहे. सुरवातीला आणि शेवटी गझलेची बाराखडी समजावून सांगून नवीन पिढीसाठी गझल शिकण्याची वाट मोकळी केली आहे. आणि सगळ्यात आव्हानात्मक काव्य प्रकार असल्याने, हे तितकंच अवघडही आहे. भट साहेबाच्या गझलेचं गमक म्हणजे कणखर, रांगडे शब्द आणि लोभस सर्वांना हवा हवासा वाटणारा आणि दुःखातून होरपळून गेल्यावर एक मुग्ध माज!
"अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही,
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही!
हे दुःख राजवर्खी.. ते दुःख मोरपंखी..
जे जन्मजात दुःखी त्यांचा निभाव नाही!
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे..
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही!
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही!"
पहिल्याच गझलेचे हे काही शेर.. प्रत्येक शेर हा आपल्या हृदयाला चिरताना आपल्याला दिसून येतो.. दुःख सहन करून इतक्या सुंदर मांडण्याची ही कला, अद्वितीय आहे! इतके दिवस घाव करणारी सुरी देखिल अजून खोल घाव करू शकत नाहीये.. आणि दुसऱ्याच शेर मधे म्हणतात हे दुःख राजवर्खी, मोरपंखी आहे.. जे दुःखात जन्मजात त्यांचा निभाव इथे लागणार नाही.

समजायला अगदी सोपी आणि आपल्या काळजाला हात घालणारी गझल भट साहेबांनी लिहिली आहे. यातला कोणताही शेर घ्या.. त्यावर दहा मिनिटे चिंतन करावे, विचार करावा असाच आहे. सगळ्यांनी हे पुस्तक नक्की आपल्या संग्रहात ठेवायला हवे. कधीही पुस्तकाकडे बघावं आणि मनात चार ओळी गुणगुणाव्या. सगळ्यांना माहिती असलेलं आणि मराठी माणसांनी जीवापाड जपलेलं हे पुस्तक आहे.

विदर्भात जन्मलेले सुरेश भट यांनी मराठी कवितेच्या जगात क्रांतीच केली अस म्हण्याला हरकत नाही. "जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!" अशा ओळींनी आपल्या आयुष्याची कहाणी माडणारा हा कवी. त्यांच्या कविता हृदयनाथ मंगेशकरांच्या हाती लागल्या आणि तिथून खरा या कवीचा नवीन प्रवास सुरू झाला, अनेक कविता, अनेक गझला, अनेक गीते त्यांनी समर्थपणे लीहली.
"पुसतात जात हे मुडदे माणसात एकमेकांना,
कोणीच विचारात नाही - "माणूस कोणता मला?"
या ओळी आताच्या चालू घडीला सगळ्यांच्याच तोंडात चपराक दिल्यासारखी आहे. आणि याच सोबत अचानक विराहवर लिहिण्याची प्रतिभा मला भांबावून सोडते, ते लिहितात...
"सारे सुगंध मिही मागेच सोसले,
आता कुण्या फुलाशी नये जडू नये!"
असेच शेर लिहीत राहिलो ते याचेही १०० पाने होतील. यात माझे इतके आवडते शेर आहेत. मला स्वतःला यात जानवी आणि एल्गार या दोन्ही गझला खूप आवडतात. तुम्ही नक्की विकत घ्या आणि मला कळवा तुम्हाला कोणता शेर आवडला, कोणती गझल आवडली! शेवट त्यांच्याच कवितेने व्हावा असा मला वाटतं. म्हणून त्यांचीच ही ओळ!
"रंगुनी रंगांत साऱ्या, रंग माझा वेगळा,
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा वेगळा!"


-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form