पुस्तक | आहे मनोहर तरी | लेखक | सुनीता देशपांडे |
---|---|---|---|
प्रकाशन | मौज प्रकाशन गृह | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २३९ | मूल्यांकन | ४ | ५ |
"सर्वांगसुंदर, सुभूषणवस्त्रयुक्त
चैतन्य, वाणि, मन, बुद्धिहि ज्या प्रशस्त
ऐसे शरीर, परि शील नसे तयास
आहे मनोहर तरी गमतें उदास"
"आहे मनोहर तरी गमतें उदास" ही दादासाहेब शिंदे यांची कविता, आणि या कवितेच्या ओळी नी ओळी प्रमाणे ज्यांना ही कविता लागू पडली असेल तर त्या म्हणजे, आपल्या सुनीताबाई देशपांडे. मी मुद्दामच पुलंच्या पत्नी असं म्हटल नाही. अथवा या पुस्तकातून त्यांनी जे सांगू पाहिले आहे त्याला काहीच अर्थ राहिला नसता. खरं पाहिलं तर सुनीताबाईंचं स्वतःचं असं खुप सुंदर आणि एक वेगळीच बाजू असलेलं आयुष्य होतं, परंतू पुलंच्या पत्नी आणि त्यांच्यासाठी आपल्या अनेक इच्छा त्यांनी अजिबातच मागे पूढे न बघता सोडून दिल्या, त्यांच्यावर पाणी सोडलं.
कविता, अभिनय, शिक्षण आणि स्वातंत्र्य चळवळ अशा प्रत्येक ठिकाणी बहु-आयामी व्यक्तिमत्व सिध्द करूनही आपल्याला सुनीताबाई निटश्या समजल्या नाहीत असच म्हणायला हवं. हे पुस्तक त्या अर्थी नक्कीच वाचयला हवं, पडद्यामागची गोष्ट, पुलंच्या आयुष्यातील आपली माहिती नसलेले अनेक क्षण. आणि अनेक लेखक कवींच्या गोष्टी. सगळं असूनही, तरीदेखील काहीतरी कमीच आहे, आणि म्हणूनच हे पुस्तक वाचताना मनात अनेक भाव दाटून येतात.
जी. ए. कुलकर्णीचा पत्रव्यवहार, बोरकरांच्या कविता, आत्रेंचा विनोद आणि याच सोबतचे काही कडू गोड क्षण, कसलीही फिकीर न बाळगता या पुस्तकात मांडलेले आहेत. कितीही झालं तरी मनाचा एक कोपरा मात्र नेहमीच स्वतःसाठी आपण राखून ठेवतो. पण काहीजण तोही दुसऱ्यांसाठी देतात आणि हाती मात्र काहीच लागत नाही. अगदी मुशाफिरी सारखं आयुष्य.. त्यात हवं तसं आणि अगदी मनाला भावेल असं जगताना आलेले अडथळे आणि गंमत दोन्हीं पुस्तकातून समजते.
प्रत्येक स्त्रीची हि व्यथा, भूमिका आणि तिच्या आत असलेली एक सुप्त हिमतीची चुणूक इथे आपल्याला दिसते. त्यामुळे पुस्तक अजून रंगते. अनेकांना आताच्या काळाशी निगडित नसल्याने थोडेसे असंबधित वाटू शकते पण ज्यांना तो काळ माहिती आहे, पुलंच्या निजी जीवनातील थोडी माहिती आहे. त्यांना या पुस्तकातून अजून बरीच वेगळी माहिती मिळेल आणि वाचयला मजा येईल. यातून पुलंच एक वेगळं चित्र डोळ्यासमोर आलं, साधे, सरळ, अगदीं निर्मळ असे. हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा!